Wed, Jun 26, 2019 17:40होमपेज › Pune › महिलांचे प्रश्‍न महिला मंत्र्यांनाच कळत नाहीत : अजित पवार 

‘महिलांचे प्रश्‍न महिला मंत्र्यांनाच कळत नाहीत’

Published On: Jan 17 2018 2:03AM | Last Updated: Jan 17 2018 2:03AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ग्रामविकासाचा कणा आहेत. बालकांना प्राथमिक पूर्व शिक्षण देण्याचे उत्तम कार्य त्यांच्याकडून केले जाते. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना कमी मानधनात काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांना आंदोलन करावे लागते. दरम्यान, महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री महिला असूनही त्यांना महिलांचे प्रश्‍न कळत नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेचे नाव न घेता केली आहे. आदर्श अंगणवाडी सेविका व मदतनीस जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण अल्पबचत भवनला त्यांच्या हस्ते करण्यात आले. 

पवार म्हणाले, विकासभिमुख कारभार करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लहान वयात मुलांचा विकास होत असतो त्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे कार्य मोलाचे आहे. स्त्री शक्तीला मान सन्मान देणारा देश कधीही मागे राहत नाही. मुलांना घडविण्याचे काम सेविकांकडून केले जाते. मात्र, शासनाकडून त्यांच्या मानधनाबाबत दुटप्पी भूमिका घेतली जात आहे. ग्रामविकासाचा कणा कमकुवत राहू नये यासाठी सेविका आणि मदतनीसांना वेळेत मानधन वाढविण्याची गरज आहे. मात्र, महिलांच्या आंदोलनानंतर तीन महिन्यात पदरात काय पडले, असा सवाल त्यांनी सरकारला केला. 
पालकमंत्री दिवस बदलणार असे म्हणत आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीचे सरकार येईल. त्यावेळी अंगणवाडी सेविकांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन पवारांनी उपस्थित अंगणवाडी सेविकांना दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष जराड यांनी केले़  प्रास्ताविक सभापती राणी शेळके, तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी मानले़   यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, बांधकाम सभापती प्रविण माने उपस्थित होते.