होमपेज › Pune › फक्त शरद पवारांचेच ऐकतो : अजित पवार

फक्त शरद पवारांचेच ऐकतो : अजित पवार

Published On: Feb 03 2018 12:09PM | Last Updated: Feb 03 2018 12:16PMबारामती : प्रतिनिधी

“मी फक्त शरद पवार सांगतील तेच ऐकतो. कोणा सोम्यागोम्याने मला सांगू नये, नगरपालिकेत गट- तट कराल तर तुमचा बंदोबस्त करेन, तुमच्या जागांवर पुन्हा राष्ट्रवादीचे लोक निवडून आणण्याची धमक माझ्यात आहे. नाही आणले तर पवारांची अवलाद सांगणार नाही,” अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी बारामतीत नगरसेवकांना झापले.

माझ्यावर दबावाचा प्रयत्न केला तर मी राजकारणात असेपर्यंत एकही पद मिळू देणार नाही, हे लक्षात घ्या, असा सज्जड दम पवार यांनी नगरसेवकांना भरला. बारामतीत आयोजित कार्यक्रमात पवार यांनी बारामती नगरपरिषदेतील राष्ट्रवादी नगरसेवकांना झापले.

ते म्हणाले, “पालिकेत 44 पैकी 40 नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. पालिकेच्या सर्वसाधारण सभेपूर्वी मी बैठक घेतो. विकासकामांसाठी निधी मंजूर करून  आणतो आहे. तुम्ही राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आला आहात. गटातटाचे राजकारण केले तर सरळ घरी बसवीन.”काही नगरसेवकांच्या त्रासामुळे अधिकारी- कर्मचार्‍यांना रजेवर जावे लागत आहे. नगरसेवकांकडून योग्य  वागणूक दिली जात नसल्याचे खुद्द अधिकारी-कर्मचारीच मला फोन करून सांगत आहेत.''

मी कठोर असलो तरी अधिकार्‍यांकडून काम कसे करून घ्यायचे हे मला माहीत आहे. काम करणार्‍या अधिकार्‍यांना मी प्रोत्साहित  करत आलो आहे. त्यामुळे तुम्हीही चांगले काम करणार्‍याला नाहक त्रास देऊ नका. अडेलतट्टूसारखे वागू नका आणि अधिकारी-कर्मचार्‍यांना घरगड्यासारखे वागवू नका. पुरुष नगरसेवकांनो, महिला नगरसेवकांशी नीट वागा. मी सांगितलेल्या गोष्टींची नोंद घ्या, मला हे आवडणार नाही. तुम्हाला सर्वांसमोर समजावून सांगतोय, नम्रतेने, विनंती करून सांगतोय, वेगवेगळे गट तयार करण्याचा प्रयत्न करू नका, असा दमही पवार यांनी नगरसेवकांना दिला.

ते म्हणाले,''गटाच्या माध्यमातून इतरांच्या सह्या घेऊन मला पत्रे देऊ नका, अशा पत्रांवर सह्या करणार्‍यांना मी राजकारणात असेपर्यंत एकही पद देणार नाही. तुम्ही 20लोकांनी सह्या केल्या तर  सगळ्यांचा बंदोबस्त करेन. तुमच्या जागी पुन्हा राष्ट्रवादीचे नगरसेवक  आणण्याची धमक माझ्यात आहे. नाही निवडून आणले तर पवारांची अवलाद सांगणार नाही, अशा भाषेत पवार यांनी नगरसेवकांना झापले. गणेश मंडईच्या गाळे वाटपात काहींनी गडबड केल्याचे माझ्या  कानावर आले आहे. मी त्याची अद्याप शहानिशा केलेली नाही. गडबड केली नसेल तर दुधात साखर. गडबड केली असेल तर ती दुरुस्त  करू. मी पवारसाहेबांसमोर पूर्वीच्याच गाळेधारकांना नवीन मंडईत गाळे मिळतील, अशी ग्वाही दिली आहे. मी शब्दाचा पक्का आहे, दिलेला शब्द पाळतो, हे जनतेलाही माहीत आहे.''