Wed, Apr 24, 2019 21:55होमपेज › Pune › आंदोलकांमध्ये सरकारने विश्‍वास निर्माण करावा

आंदोलकांमध्ये सरकारने विश्‍वास निर्माण करावा

Published On: Aug 01 2018 1:33AM | Last Updated: Aug 01 2018 12:34AMपुणे : प्रतिनिधी 

देशातील या अगोदरचे सरकार नाठाळ होते, तर आत्ताचे केंद्र सरकार हे जगातील अंतिम सत्य आम्हालाच कळाले, अशा आविर्भावात असते. सध्यातरी आम्ही सर्व पक्षांपासून समान अंतरावर आहोत. शेतमालास दीडपट हमीभावाचे आश्‍वासन पाळले गेले नसल्याने शेतकर्‍यांची फसवणूक झाली. त्यामुळे आम्ही भाजपशी संबंध तोडलेले आहेत. म्हणजे काँग्रेसबरोबर आमची आघाडी झाली असे नाही. मात्र, भाजपबरोबर जाणार नसल्याचा पुनरुच्चार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात ते मंगळवारी बोलत होते. मागील लोकसभा निवडणुकीत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी पुढाकार घेत शेतकर्‍यांसह निवडणुका लढविण्यासाठी आम्हाला बरोबर घेतले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव देण्याचे आश्‍वासन दिले होते. ते पाळले न गेल्याने शेतकर्‍यांची फसवणूक झाली आहे.  मागील सरकारच्या काळात केंद्रीय कृषिमंत्री म्हणून शरद पवार हे निर्णय प्रक्रियेत असत. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर टीका करायचो. परंतु, त्यांचे आणि माझे वैयक्तिक कोणतेही भांडण नाही. सध्याचे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंग आहेत की नाहीत हे त्यांनाच माहिती नाही. कारण सर्व काही निर्णय मोदीच घेत असल्याची टीकाही त्यांनी केली. 

केंद्राने प्रक्रिया उद्योगाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. गेल्या पाच वर्षांत नाबार्डकडून शीतगृहे, पॉलीहाऊस बांधणे, गोदाम बांधण्यासाठी अनुदान शेतकर्‍यांना दिले जाते. ही नाबार्डची प्रक्रिया सर्व ठप्प आहे. अशा स्थितीत वाढलेले उत्पादन ठेवण्यासाठी जागा नसेल तर काय करायचे, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.