Tue, Mar 26, 2019 11:41होमपेज › Pune › शिवसेनेच्या रणरागिनींचे राम कदमांच्या विरोधात आंदोलन

शिवसेनेच्या रणरागिनींचे राम कदमांच्या विरोधात आंदोलन

Published On: Sep 07 2018 3:47PM | Last Updated: Sep 07 2018 3:47PMपिंपरी : प्रतिनिधी

'तुम्हाला मुलगी पसंत असेल तर तिला पळवून आणायला मदत करेन, कधीही फोन करा' असे वक्तव्य करून महिलांचा अवमान करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांच्या प्रतिमेस शिवसेना महिला आघाडीने खेटराने मारले. तसेच, गाढवावरुन धिंडही काढली. छत्रपती शिवरायांच्या राज्यात या ’रावण’ कदमने असे वक्तव्य केले असते तर त्याचे दोन्ही हात कलम केले असते, असे सांगत त्यांच्या प्रतिमेचे तलवारीने हात कलम करण्यात आले.  

दहीहंडी उत्सावात मुली-महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात शुक्रवारी तीव्र निदर्शने करण्यात आली. 'राम कदम यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय', ' भाजप सरकार हाय हाय’ अशा घोषणा देत राम कदम यांच्या प्रतिमेला 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले. महिला आघाडीच्या रणरागिनींनी कदम यांच्या पुतळ्याला चपलांनी बडवून निषेध केला. कदम यांचे बॅनर्स पायदळी तुडवले. भाजपने ’रावण’ कदम यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख वैशाली सूर्यवंशी, शहर संघटक सुलभा उबाळे, शहरप्रमुख योगेश बाबर यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात नगरसेविका अश्विनी चिंचवडे, मीनल यादव, सुशीला पवार, विजया जाधव, स्वरुपा खापेकर, प्रतीक्षा घुले, अनिता तुतारे, स्मिता जगदाळे, आशा भालेकर, शशिकला उभे,   पल्लवी दांगट, धनंजय आल्हाट, युवराज कोकाटे, रोमी संधू, संतोष सौदणकर, भाविक देशमुख, वसंत भोसले, गजानन धावडे, विलास पवार, सर्जेराव भोसले, सोनू संधू आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.