Tue, Apr 23, 2019 19:37होमपेज › Pune › आंदोलन मागे घेणार नाही; सहकारी संघाच्या कर्मचाऱ्यांचा इशारा

आंदोलन मागे घेणार नाही; सहकारी संघाच्या कर्मचाऱ्यांचा इशारा

Published On: Jul 12 2018 4:33PM | Last Updated: Jul 12 2018 4:39PMपुणे : प्रतिनिधी
राज्य सहकारी संघाचा शिक्षण निधी येत्या १५ दिवसांत सुरु करण्याचे  आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे झालेल्या एका बैठकीत दिले आहे. संघाचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ कर्मचार्‍यांच्या पाठीशी असून सर्व प्रश्‍न निश्चितपणे मार्गी लावले जातील, असे आश्वासन संघाच्या मानद सचिव विद्या पाटील यांनी सहकारी संघाच्या सहकारी संघाच्या सुरु असलेल्या आंदोलनस्थळी देत उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. 

मात्र, लेखी आश्‍वासनाशिवाय सहकार आयुक्तालयासमोरील आमरण उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा कामगारांनी घेत घोषणाबाजी सुरुच ठेवली. राज्य सहकारी संघाला १३ जुलै २०१८ रोजी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, अधिकारी, कर्मचार्‍यांचा मागील १५ महिन्यांचा पगार थकलेला आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सहकार आयुक्तालयासमोर गेली १० दिवस कर्मचार्‍यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.

बुधवारी आंदोलनातील ५ कर्मचार्‍यांची प्रकृती खालावल्याने सायंकाळी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कर्मचारी संघटनचे अध्यक्ष जे. डी. जाधव व सचिव डी. डी. सोनाळेकर यांनी आंदोलनस्थळी गुरुवारी दिली. यावेळी 'पुढारी' शी बोलताना मानद मानद सचिव विद्या पाटील म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासमवेत संघाचे माजी संचालक आमदार प्रवीण दरेकर आणि मी अशी संयुक्त चर्चा नुकतीच केली आहे. 

सहकार कायद्यातील ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार संघाचा शिक्षण निधी बंद झालेला आहे. तो पूर्ववत सुरु करण्याची मागणी आम्ही केली आहे.  त्यावेळी शिक्षण निधी पुन्हा  सुरु करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. सहकारी संघाचे नवीन संचालक मंडळ दोन महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत निवडून आलेले आहे. त्यामुळे मागील संचालक मंडळाच्या काळात काय झाले, या घोळात आम्ही जाणार नाही. परंतु, कर्मचारी अधिकार्‍यांच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसह संघाला उर्जितावस्था आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. याबाबत कर्मचार्‍यांच्या मागण्या पुन्हा मुख्यमंत्र्यांसमोर नागपूर येथे जाऊन मांडणार आहे.

यावेळी उपोषण मागे घेण्याच्या पाटील यांच्या आवाहनाला कर्मचार्‍यांनी प्रतिसाद दिला  नाही. जोपर्यंत शासनाकडून लेखी आश्‍वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे  यावेळी संघटनेच्या पदाधिका-यांनी स्पष्ट केले. संघाचा शिक्षण निधी पूर्ववत सुरु करावा आणि संघाला शासनाकडून  अनुदान मिळावे, अशा मागण्या कर्मचार्‍यांनी यावेळी केल्या. एवढेच नाही तर संचालकांनी खुर्च्या खाली करण्याची मागणी केली.