Thu, Jun 04, 2020 12:58होमपेज › Pune › पुण्याला पुन्हा पावसाचा तडाखा

पुण्याला पुन्हा पावसाचा तडाखा

Last Updated: Oct 10 2019 1:24AM

एस.पी. कॉलेजसमोर व्हॅनवर झाड कोसळल्याने चालकाचा मृत्यू झाला.पुणे : प्रतिनिधी 
पुण्याला आज पुन्हा एकदा पावसाचा तडाखा बसला. बुधवारी पहाटे व सायंकाळी वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. शहरासह उपनगरात ठिकठिकाणी सायंकाळनंतर मेघगर्जनेसह दमदार पाऊस पडला.त्यामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. तसेच अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. पुण्यात रात्री 8.30 वाजेपर्यंत 20.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

दरम्यान, एस. पी. कॉलेजसमोर पावसात बंद पडलेल्या पीएमपीएल बसच्या मदतीसाठी आलेल्या वायरलेस व्हॅनवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत चालकाचा मृत्यू झाला. विजय ऊर्फ बंडू नवगुणे (वय 50, रा. पद्मावती, सहकारनगर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागासह दक्षिण, पश्‍चिम व पूर्व पुण्यात पहाटे चार ते सहा वाजेदरम्यान धो-धो पाऊस पडला. गेल्या 24 तासांत शिवाजीनगर 10.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पाषाण येथे तब्बल 50.3 मिलिमीटर व लोहगाव येथे सर्वाधिक 66.2 मिलिमीटर पाऊस बरसला. 

सायंकाळी साडेपाच वाजेनंतर काळेकुट्ट ढग दाटून आले व पावणेसहा वाजेपासून टपोर्‍या थेंबांनिशी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ढगांमुळे सायंकाळी सहा वाजताच रात्री 8 वाजले असल्याचा ‘फील’ नागरिकांना आला. दक्षिण पुणे, मध्यवर्ती पेठा, पश्‍चिम पुण्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता.  पावसामुळे सखल भागात पाणी साठून वाहतूक कोंडी झाली. अचानक आलेल्या पावसामुळे दुचाकीस्वारांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. सुमारे दीड तास पावसाचा जोर टिकून होता. 

एस. पी. कॉलेजसमोर घडलेल्या दुर्घटनेविषयी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, बुधवारी सायंकाळी पीएमपीएलसाठी काम करीत असलेली ठेकेदाराची एक बस एस.पी. कॉलेज परिसरात बंद पडली होती. या बसच्या दुरुस्तीसाठी नवगुणे हे वायरलेस व्हॅन घेऊन आले होते. यावेळी बसमध्ये नवगुणे त्यांचे सहकारी मारुती पवार व आणखी एक जण होते. 

बंद पडलेल्या बसची पाहणी करण्यात आली. मात्र, बस सुरू होत नव्हती. यामुळे ती बस व्हॅनला जोडून घेऊन जात होते. त्याच वेळी शहरात अचानक वादळी वार्‍यासह मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला. त्यावेळी नवगुणे ग्राहक पेठेसमोर व्हॅन घेऊन आल्यानंतर येथील मोठे झाड व्हॅनवर कोसळले. यात नवगुणे हे बसमध्ये अडकले.  यावेळी पवार व त्यांचा आणखी एक सहकारी बसमधून वेळीच बाहेर पडल्याने ते बचावले. हे झाड इतके मोठे होते की, व्हॅनवर झाड आदळल्यानंतर व्हॅनचा चालकाचा पुढचा भाग पूर्ण दबला गेला. यात अडकून नवगुणे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, हे झाड काढण्याचे काम एक ते दीड तास सुरू होते.