Sat, Feb 23, 2019 04:18होमपेज › Pune › अतिरिक्त दूध खरेदी बंदचा निर्णय पुढे ढकलला

अतिरिक्त दूध खरेदी बंदचा निर्णय पुढे ढकलला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

राज्यात अतिरिक्त ठरत असलेल्या दुधाची खरेदी 1 डिसेंबरपासून बंद करण्याच्या दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या निर्णयावर समितीची स्थापना करण्यात आलेली असून अहवाल प्राप्त होताच दूध दरप्रश्‍नी योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. याप्रश्‍नी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी  केलेली मध्यस्थी यशस्वी ठरल्याने आंदोलन तूर्तास पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष विनायक पाटील आणि गोपाळ म्हस्के यांनी दिली. 

राज्य सरकारने दूध संघांना गाईच्या दुधाचा खरेदी दर लिटरला 27 रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे अंमलबजावणीही करण्यात येत होती. मात्र, दूध व्यावसायिकांनी हा दर कमी करताच दुग्ध विकास विभागाकडून सहकारी संघांना 79(अ) नोटिसा पाठवून कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर संघांनी न्यायालयात जाऊन कारवाईस स्थगिती मिळविली. शासनाने अतिरिक्त दूध खरेदी करावे, खरेदीस लिटरला 7 रुपये अनुदान द्यावे, शालेय पोषण आहारात दूध भुकटीचा समावेश करावा, दूध पावडर तयार करण्यास लिटरला 5 रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली होती. त्याबाबत निर्णय न घेतल्यास अतिरिक्त दुधाची खरेदी 1 डिसेंबरपासून बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. 

या सर्व घडामोडींनंतर औरंगाबाद सहकारी दूध संघाच्या कार्यालयात मंगळवारी (दि.28) विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये सहकारी संघांवर नोटिसांअन्वये करण्यात येणारी कारवाई शासन मागे घेत असल्याचे आश्‍वासन दुग्धविकास मंत्री जानकर यांनी दिले. त्यानंतर नियोजित अतिरिक्त दूध खरेदी बंदचे आंदोलन पुढे ढकलण्यात आल्याचे पाटील व म्हस्के यांनी सांगितले. दूध खरेदी बंद आंदोलन पुढे ढकलल्यानंतर जानकर यांच्या हस्ते गोपाळ म्हस्के आणि विनायक पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बैठकीस  महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, कात्रज दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर, रणजितसिंह मोहिते पाटील, बारामती दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांच्यासह बुलढाणा, अमरावती, शिराळा दूध संघांचे अध्यक्ष उपस्थित होते.