होमपेज › Pune › कार्यकर्ता प्रशिक्षणाची प्रत्येक पक्षात गरज : गिरीश बापट 

कार्यकर्ता प्रशिक्षणाची प्रत्येक पक्षात गरज : गिरीश बापट 

Published On: Sep 10 2018 1:17AM | Last Updated: Sep 10 2018 1:01AMपुणे ः प्रतिनिधी

राजकीय पक्ष ही व्यक्तींची नाही, तर विचारांची लढाई असते हे आपण विसरत चाललो आहोत. सध्या पक्षांतर्गत राजकीय अस्थिरता वाढत असून कार्यकर्ता कसा असावा, याचे प्रत्येक पक्षामध्ये प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. 

धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा कै.धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, रामदास फुटाणे, शिरीष बोधनी, बिपीन गुपचुप, डॉ. विकास आबनावे, धनंजय थोरात यांच्या पत्नी शुभांगी थोरात उपस्थित होते. याप्रसंगी अहमदनगर जिल्ह्यातील डॉ.राजेंद्र धामणे आणि डॉ.सुचेता धामणे, अरुण काकतकर, समाजसेवक प्रदीप लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.

बापट म्हणाले, आम्ही विविध पक्षातील कार्यकर्ते प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकत्र येतो, ही पुण्याची संस्कृती आहे. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, अरुण काकतकर नसते, तर मी कधीच प्रकाशात आलो नसतो. त्यांनी आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करुन दिले, अशा शब्दांत काकतकर यांना त्यांनी धन्यवाद दिले. यावेळी उल्हास पवार यांनी मनोगत व्यक्त केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन तर शिरीष बोधनी यांनी आभार मानले.