Sun, May 26, 2019 13:39होमपेज › Pune › शिक्षिकेच्या अपघाती मृत्युप्रकरणी कुटुंबियांना ५५ लाख ९७ हजारांची भरपाई 

शिक्षिकेच्या मृत्युप्रकरणी ५५ लाखांची भरपाई 

Published On: May 18 2018 3:08PM | Last Updated: May 18 2018 5:11PMपुणे : प्रतिनिधी 

दुचाकीवरून निघालेल्या प्राथमिक शिक्षिकेला टँकरने दिलेल्या धडकेत झालेल्या अपघाती मृत्यू प्रकरणी मोटार अपघात न्यायाधिकरणाने पतीसह आई वडीलांना ५५ लाख ९७ हजार ९५० रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एच. मोहम्मद यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला आहे. टँकर मालक, टँकर चालक तसेच विमा कंपनीला वैयक्‍तिक व संयुक्तीकरित्या ही भरपाई देण्याचे आदेशात म्हटले आहे.

रकमेपैकी ५० टक्के रक्कम पती फैयाज मोमीन यांना देण्याचे तर १६.६७ टक्के रक्कम वडील निसार अहमद कासम मुल्ला (५८) यांना तसेच ३३.३३ टक्के रक्कम आई जमिला नासीर अहमद मुल्ला (५२, दोघेही रा. प्रतिकनगर सोसायटी, ससाणेनगर, हडपसर ) यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

याप्रकरणी फैय्याज मन्सूर मोमीन (३४, रा. ससाणेनगर, हडपसर) यांच्या वतीने अ‍ॅड. अस्लम पिरजादे आणि अ‍ॅड. प्रसाद शिवरकर तसेच अ‍ॅड. सबिना रिजवान यांनी दावा दाखल केला होता. किशोर विश्‍वनाथ साधे (३२, रा. थिटे वस्ती, खराडी मूळ रा. परभणी), नितीन यशवंत शिवरकर (रा. रास्तापेठ) तसेच युनाएटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (रा. आरोरा टॉवर्स, एमजी रोड) यांच्या विरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता. 

आस्मा फैय्याज मोमीन या प्राथमिक शिक्षिका होत्या. दि. २१ मे २०१५ रोजी त्या हडपसर येथील ससाणेनगर रोडने काळेपडळकडे दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास जात असताना ससाणेनगर येथील गणपती चौकात मागील बाजूने आलेल्या टँकरने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यावेळी त्या गर्भवती देखील होत्या. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हडपसर पोलिस ठाण्यात टँकर चालका विरोधात गुन्हा दाखल झाला.  

टँकर चालक किशोर साधे चालवत होते. तर टँकरचे मालक नितीन शिवरकर आहे. तसेच विमा कंपनी विरोधात न्यायालयात अपघात नुकसानी प्रकरणी दावा दाखल झाल्यानंतर नुकसान भरपाई देण्यास विमा कंपनीच्यावतीने विरोध करण्यात आला. त्यांच्यामते अपघातवेळी टँकरला माल वाहतुकीचा परवाना नसल्याने मृताच्या वारसांना नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नसल्याचे म्हटले. विमा कंपनीचा बचाव अमान्य करून हा अपघात टँकर चालकाच्या चुकीमुळे झाल्याचे ग्राह्य धरून मृताचे वय आणि उत्पन्न या बाबी लक्षात घेऊन मृताच्या वारसांना ५५ लाख ९७ हजार ९५० रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. रक्कम वसूल होईपर्यंत ९ टक्के व्याजही देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.