Thu, Jul 18, 2019 12:16होमपेज › Pune › मोटारीच्या धडकेत दोन ठार; पाच जण जखमी

मोटारीच्या धडकेत दोन ठार; पाच जण जखमी

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 13 2018 12:38AMदेहूरोड : वार्ताहर

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वळसा घेणार्‍या मारुती सेलोरो मोटारीस भरधाव स्कॉडाची धडक बसून झालेल्या अपघातात सेलोरोमधील दोघे जण ठार झाले; तर तीन वर्षाच्या बालिकेसह पाच जण जखमी झाले. महामार्गावरील पुणे गेट हॉटेलजवळ रविवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. धडक दिल्यानंतर भरधाव निघून जाणार्‍या स्कॉडाचा नागरिकांनी पाठलाग करून निगडीच्या श्रीकृष्ण मंदिराजवळ चालकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

दीपक अल्लावत (25) आणि अनिकेत सागवान (28, दोघे  रा. मोरवाडी, पिंपरी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.  तर ऋतुराणी सागवान, अमित सागवान (वय समजू शकले नाही.), तनिष्का सागवान (3), निशिता सागवान (6) आणि रोहित अल्लावत अशी जखमींची नावे आहेत. या अपघातप्रकरणी श्रीवत्स सुभाष सिन्हा (30, रा. कोरेगाव पार्क, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. 

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी, रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हॉटेल पुणे गेटच्या समोरून दीपक अल्लावत आपली सेलोरो मोटार क्र. (एमएच 12 क्यूएफ 1316) महामार्गावरून वळवित होते. त्यादरम्यान मागून भरधाव येणार्‍या स्कॉडा गाडीची त्यांच्या गाडीला मागील बाजूस जोरदार धडक बसली. या घटनेत मोटारीचा अक्षरशः चक्काचूर झाला. या धक्क्याने मोटार रोडच्या दुसर्‍या बाजूला फेकली गेली. त्यात जबर दुखापत झाल्याने अल्लावत आणि सागवान बेशुद्ध पडले. त्यांना अन्य जखमींसह रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र, डॉक्टरांनी त्या दोघांना मृत घोषित केले. 

नागरिकांनी घटनास्थळावरून पळ काढणार्‍या स्कॉडाचालक सिन्हा याला पाठलाग करून पकडले. घटनास्थळी पोलिस पोहचताच त्यांच्या ताब्यात देण्यात आले. देहूरोड पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.