होमपेज › Pune › निराश्रितांना मिळणार मायेची ऊब

निराश्रितांना मिळणार मायेची ऊब

Published On: Dec 07 2017 1:24AM | Last Updated: Dec 07 2017 12:12AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

शहरामध्ये किंवा इतरत्र कुठेही उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये रस्त्याच्या कडेला निराश्रिताचे जीवन जगणार्‍या व्यक्ती आपण पाहतो. निवारा नसल्याने प्रत्येक ऋतूमध्ये या व्यक्ती कशाचा तरी आडोसा घेऊन आपला जीव वाचविताना दिसतात. अशा व्यक्तींसाठी काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ऊबदार कपडे वाटप करण्याचा वसा घेतला आहे. विद्यार्थ्यांनी ‘आपुलकी’ नावाच्या उपक्रमातून नागरिकांना जुने, वापरात नसलेले मात्र चांगल्या अवस्थेतील कपडे देण्याचे आवाहन केले आहे. 

सध्याच्या प्रचलित संस्कृतीमध्ये फार जुने कपडे हे बिनकामाचे होतात किंवा घरात जुन्या कपड्यांची गर्दी होत असल्यामुळे अडचण होऊ लागते. पूर्वीच्या काळी गोधडी शिवण्यासाठी जुन्या कपड्यांचा उपयोग होत होता; मात्र आता गोधडी ही इतिहासजमा होत असल्याने, जुन्या कपड्यांचे करायचे काय, हा प्रश्‍न अनेकांना पडतो. अशा वेळी जुने कपडे हे फेकून दिले जातात.

अशा वेळी जुने कपडे फेकून देऊ नका, तर एखाद्या गरजवंतास द्यावेत यासाठी दर वर्षी हे तरुण आणि तरुणी पुढाकार घेतात. यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. यासाठी त्यांनी सोशल मीडियातून नागरिकांना कपडे जमा करण्याचे आवाहन केले आहे. 14 ते 15 डिसेंबरपर्यंत नागरिकांकडून कपडे जमा करण्यात येणार आहेत आणि 18 डिसेंबर रोजी देहूरोड ते आळंदी येथील मार्गावरील, पुलाच्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी आढळणार्‍या बेवारस व्यक्तींना हे कपडे देण्यात येणार आहेत.