Mon, May 20, 2019 08:07होमपेज › Pune › ‘आधार बेस बायोमेट्रिक’ यंत्रणेत पालिका कर्मचार्‍यांचाच खोडा

‘आधार बेस बायोमेट्रिक’ यंत्रणेत पालिका कर्मचार्‍यांचाच खोडा

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 26 2017 12:49AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

कमचार्‍यांची हजेरी नोंदवण्यासाठी त्यांच्या आधार कार्ड नंबरला जोडण्यात येणार्‍या  ‘आधार बेस बायोमेट्रिक’ यंत्रणेला काही महापालिका कर्मचारीच खोडा घालत असल्याचे समोर आले आहे. या यंत्रणेमुळे वेळेत ये-जा करणे बंधनकारक होणार असल्याने ही यंत्रणा सुरूच कशी होणार नाही याकडे अनेकांनी लक्ष पुरविण्यास सुरुवात केली आहे. 

पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी ही पद्धती राबवण्याचे  आदेश दिले होते. या यंत्रणेला अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचार्‍यांनी तातडीने या यंत्रणेत नोंदणी करुन त्याचा अहवाल तातडीने देशभ्रतार यांच्याकडे द्यावा, अशा सूचना उपायुक्त अनिल मुळे यांनी दिल्या होत्या.  ही यंत्रणा सुरू राहण्यासाठी लागणार्‍या इंटरनेटचे स्पीड मिळत नाही, वायफाय बंद पडते, अशी कारणे पुढे करत यासाठी अळमटळम केली जात आहे. महापालिकेच्या विविध विभागांत सर्वसाधारण 20 हजार कर्मचारी, अधिकारी काम करतात.

कामावर येण्याची आणि जाण्याची वेळ नोंदविण्यासाठी पालिकेच्या मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रशासनाने बायोमेट्रिक यंत्रणाही बसविली आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही यंत्रणा बसविण्यात आली असून, यामध्ये काही प्रमाणात त्रुटी आहेत.  त्यावर उपाय म्हणून अधिकारी, कर्मचारी यांची हजेरी ऑनलाइन पाहता यावी, यासाठी केंद्र सरकारने ‘आधार बेस बायोमेट्रीक’ यंत्रणा विकसित केली आहे. केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या अनेक कार्यालयांमध्ये ही यंत्रणा वापरली जात असल्याने या यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय पालिकेत घेतला होता. विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंता श्रीनिवास कंदुल यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली आहे. त्यांनी 8 हजार कर्मचारी, अधिकारी यांची नोंदणी झाली असून या यंत्रणेत काही अडचणी निर्माण केल्या असण्याचाही दुजोरा दिला .

हीच यंत्रणाच का ?

यामध्ये अनेक सुविधा उपलब्ध असल्याने कर्मचार्‍यांनी त्यांच्या बोटाचे ठसे दिल्यानंतर आधार क्रमांकाबरोबर त्याची पडताळणी होणार आहे. संबंधित यंत्रणेत  कर्मचारी तसेच अधिकारी यांचा आधार क्रमांक जोडला जाणार असल्याने बोगस कर्मचारी यांना आळा बसणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या 60 ते 70 मशीनची खरेदी देखील पालिकेने केली आहे.