Mon, May 20, 2019 18:44होमपेज › Pune › श्रेयवादाच्या लढाईने नागरिक संभ्रमात

श्रेयवादाच्या लढाईने नागरिक संभ्रमात

Published On: Jan 23 2018 1:25AM | Last Updated: Jan 23 2018 12:28AMपुणे : नवनाथ शिंदे

जिल्हा परिषदेच्या विविध कामांच्या श्रेयवादामुळे जिल्हाभरात आजी-माजी सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी होत आहे. शासनाकडून मुद्रांक शुल्कचा निधी वेळेत न मिळाल्याने सध्या विविध कामे संथ गतीने सुरू आहेत;  तर माजी जिल्हा परिषद  सदस्यांच्या फंडातून मंजूर असलेल्या अनेक कामांची उद्घाटने नवीन सदस्यांसह आजी-माजी आमदारांच्या हस्ते करण्यात येत आहे. विकासकामाच्या या श्रेयवादाच्या लढाईमुळे  नागरिक संभ्रमात पडले आहेत. 

जिल्हा परिषदेच्या वतीने गावोगावचा विकास करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे; मात्र, विकासकामांना वेळेत निधी उपलब्ध होत नसल्यामुळे सदस्यांमध्ये नाराजी आहे. जिल्हा परिषद निवडणूक होऊन 10 महिन्यांचा कालावधी लोटला तरी  नवीन कामांना मंजुरी नसल्याने नागरिकांनी सदस्यांकडे कामासाठी तगादा लावला आहे. दरम्यान नागरिकांच्या समाधानासाठी जुन्या कामांचा शुभारंभ करण्यासाठी काही जिल्हा परिषद सदस्यांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. सन 2012 ते 2017 या कालखंडात असलेल्या अनेक सदस्यांकडून विकासकामांना मंजुरी घेण्यात आली होती; मात्र निधीअभावी कामकाज रखडले होते.

दरम्यान शासनाकडून काही प्रमाणात निधी उपलब्ध झाल्यामुळे जुन्या कामांची वर्कऑर्डर घेऊन कामास सुरुवात केली जात आहे.  दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीमध्ये एका रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर केवळ नामावलीचा बोर्ड न लावल्यामुळे एका संतप्‍त जिल्हा परिषद सदस्यांनी चक्क सुरू असलेले काम थांबविण्याचे आदेश  दिले. वास्तविक कामाची मंजुरी माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या कालखंडात घेण्यात आली होती. फक्त वर्कआर्डर विद्यमान सदस्यांनी आणल्यामुळे कामाच्या ठिकाणी बोर्ड आणि नारळ फोडण्याचा अट्टहास सदस्यांनी धरला. त्यानंतर सदस्यांनी सारवासारव करत कामाच्या गुणवत्तेबद्दल तक्रार आल्यामुळे काम बंद केल्याचे सांगितले. दरम्यान, रस्त्याच्या कामकाजासाठी फक्त खोदाई सुरू असताना गुणवत्तेचा प्रश्‍न कसा उपस्थित होऊ शकतो, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

कामाचा श्रेयवाद घेण्याची स्पर्धा पंचायत समितीच्या उपसभापतींमध्येही लागली असल्याचे पत्रव्यवहारावरून आढळून आले आहे. भोर पंचायत समितीच्या उपसभापतींकडून 11 जानेवारीस समाजकल्याण विभागाच्या सभापतींच्या नावे दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांना मंजुरी मिळण्याची मागणी करण्यात आली. 13 जानेवारीला  संबंधित पंचायत समितीच्या उपसभापतींकडून आळंदे ग्रामपंचायतीला दलित वस्ती अंतर्गत रस्त्याचे काम विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आले असून, रस्त्याच्या कामास लवकरच सुरुवात होणार आल्याचे पत्र पाठविण्यात आले आहे.