Sun, Mar 24, 2019 06:13होमपेज › Pune › भोसरीत गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

भोसरीत गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

Published On: Aug 11 2018 1:21AM | Last Updated: Aug 11 2018 1:16AMपिंपरी : प्रतिनिधी

भोसरीमध्ये राजेश्‍वर पाटील (वय 30) या मराठा समाजातील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अनेक मोर्चे काढूनही सरकार आरक्षण देत नसल्याने राजेश्‍वरने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांकडून केला जात आहे, तर आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा कोणताच पुरावा अथवा चिठ्ठी मिळाली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. 

पोलिसांना गुरुवारी (दि. 9) सकाळी भोसरी परिसरात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह  झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. शुक्रवारी (दि. 10) नातेवाईक आल्यानंतर राजेश्‍वरने आत्महत्या केल्याचे समोर आले. 

राजेश्‍वर बेरोजगार असून, तो सध्या संत तुकारामनगर येथे त्याच्या मोठ्या भावाकडे राहात होता. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने राजेश्‍वर गेल्या कित्येक दिवसांपासून तणावाखाली होता. राजेश्‍वरला एमआयडीसीमध्ये प्रयत्न करूनही नोकरी मिळाली नाही. गुरुवारी (दि. 9) सगळीकडे सुरू असलेल्या मोर्चाच्या बातम्या तो पाहात होता. या बाबत कोणतीच ठोस भूमिका राज्य सरकार घेत नाही, या नैराश्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप राजेश्‍वरचा मोठा भाऊ ज्ञानेश्‍वर यांनी केला आहे. 

याबाबत भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र जाधव यांना संपर्क केला असता ते म्हणाले की, आरक्षण हे राजेश्‍वरच्या आत्महत्येचे कारण नाही. आरक्षणासाठी आत्महत्या केली असल्याचे किंवा इतर कोणतेही कारण लिहिलेली चिठ्ठी वगैरे काहीच सापडली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, लवकरच खरे कारण समोर येईल.

रात्री आम्ही मराठा समाजाच्या आंदोलनाच्या बातम्या पाहात होतो. त्यावेळी राजेश्‍वर म्हणाला की, आरक्षण भेटेल अशी कोणतीच आशा दिसत नाही. राज्य सरकार ठोस भूमिका घेताना दिसत नाही. त्यानंतर रात्रीच तो घराबाहेर गेला. त्या नैराश्यामधूनच त्याने हे कृत्य केले असावे. - ज्ञानेश्‍वर पाटील, भाऊ

मराठा समाज आरक्षणासाठी आणखी एकाचा बळी गेला. राज्य सरकारचे डोळे आता तरी उघडणार का?  आणखी किती मराठा समाजातील तरुणांचे बळी या सरकारले हवे आहेत ? - अभिमन्यू पवार, प्रदेश उपाध्यक्ष, संभाजी बिग्रेड.