Sun, Nov 18, 2018 05:02होमपेज › Pune › पत्नीचा खून करून युवकाची आत्महत्या 

पत्नीचा खून करून युवकाची आत्महत्या 

Published On: Dec 18 2017 2:40AM | Last Updated: Dec 18 2017 1:40AM

बुकमार्क करा

पुणे / बिबवेवाडी : प्रतिनिधी 

बिबवेवाडी परिसरातील राजीव गांधी नगरमध्ये राहणार्‍या पतीने संशयावरून झालेल्या भांडणातून पत्नीचा उशीने तोंड दाबून खून केला. त्यानंतर  घराच्या सिलिंगला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.  रामदास दशरथ चालेकर (वय 37) व सारिका रामदास चालेकर (30) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. शवविच्छेदन अहवालात सारिका हिचा मृत्यू  श्‍वास रोखल्याने झाल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, संशयाने  कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयत रामदास चालेकर हा जोशी हॉस्पिटलमध्ये वॉर्डबाय म्हणून तर सारिका प्रयाग हॉस्पिटलमध्ये आयाचे काम करते. त्यांना रितिक (17) व रोहित (15) अशी दोन मुले आहेत.   रितिक  हा इयत्ता 11 वीमध्ये शाहू महाविद्यालयात शिकतो. रोहित हा बहिःस्थ परीक्षक म्हणून दहावीची परीक्षा देत असून, तो पेपर टाकण्याचे काम करतो.  पुणे अमेचर संघटनेकडून तो कबड्डी   खेळत असल्याने सदाशिव पेठ येथे राहण्यासाठी होता.  रामदास व त्याची पत्नी रोहितसह बिबवेवाडीतील राजीव गांधी नगरमध्ये रायगड चाळीत राहण्यास आहेत. दरम्यान  पत्नीच्या चारित्र्यावरील संशयामुळे उभय दाम्पत्यामध्ये  वारंवार भांडण होत होते. दरम्यान या कारणावरून शनिवारी सायंकाळी सहापासून कडाक्याचे भांडण सुरू होते. रात्री त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. त्यावेळी रोहितही तेथेच होता. याबाबत सारिकाने तिच्या आईला सांगितल्यानंतर तिची आई घरी आली. त्यांनी दोघांतील भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला  आणि रात्री एक वाजता निघून गेल्या. मात्र तरीही दोघांत कुरबुर सुरू होती. त्यानंतर रोहित व सारिका वरच्या माळ्यावरील खोलीत झोपले. तर रामदास तळमजल्यावरील खोलीत जाऊन झोपला. पहाटे साडेचार वाजता रोहित पेपर टाकण्यासाठी घरातून बाहेर पडला. आई झोपलेली आहे, असे समजून  जाताना त्याने वडिलांना सांगितले. मात्र, तो सकाळी घरी आला तेव्हा वडील घराचा दरवाजा उघडत नाहीत म्हणून त्याने दरवाजाच्या फटीतून आत पाहिले, तेव्हा रामदास यांचा मृतदेह त्याला सिलिंगला लटकलेला दिसला. त्यानंतर त्याने शेजार्‍यांना ही बाब सांगितली. तेव्हा त्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता रामदास चालेकर यांनी घरातील सिलिंगच्या लोखंडी अ‍ॅँगलला ओढणीने गळफास घेतल्याचे दिसले. तर सारिका यांना हलवून उठविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांची हालचाल होत नव्हती. त्यानंतर त्यांनी बिबवेवाडी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले तर  सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी निरीक्षक कोपनर यांच्यासमवेत घटनेची पाहणी केली. 

मुलांवर  मानसिक आघात 
रोहित पहाटे निघून गेला तेव्हा त्याने आई झोपलेली आहे, असे समजून तिला उठविले नाही. त्यानंतर त्याने वडिलांना सांगितले  आणि परत आल्यावर त्याला दोघेही मृतावस्थेत दिसल्याने त्याला मोठा मानसिक धक्का बसला.  रितिकला तर सकाळी आजीकडून  बिबवेवाडीत घरी आणल्यानंतरच हा प्रकार समजला. त्यामुळे त्यालाही याचा मानसिक धक्का बसला आहे.  दरम्यान रात्री रोहित आणि सारिका झोपल्यावर रामदासने तिचा उशीने तोंड दाबून  खून केला आणि त्यानंतर तो जाऊन खालच्या खोलीत झोपला असावा. रोहित निघून गेल्यावर त्यानेही तिच्या खोलीत जाऊन गळफास घेतला, असा अंदाज पोलिस आणि शेजार्‍यांनी व्यक्त केला आहे. या घटनेचा रोहितवर मानसिक आघात झाला आहे.