Sat, Mar 23, 2019 12:03होमपेज › Pune › अन्नाची नासाडी रोखण्यासाठी सरसावले तरुण

अन्नाची नासाडी रोखण्यासाठी सरसावले तरुण

Published On: Aug 13 2018 1:22AM | Last Updated: Aug 12 2018 10:56PMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

भारतीय संस्कृतीने अन्न हे पूर्णब्रह्म मानले आहे. ‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे,’असे जेवणाआधी वंदन करण्याची प्रथा आहे.  मात्र, जीवनात आपले आचरण वेगळेच दिसते.  जागतिक क्रमवारीनुसार भुकेल्या देशांच्या यादीत भारत 67वा, तर अन्न वाया घालवणार्‍यांमध्ये सातव्या क्रमांकाचा देश ठरला आहे.  हे वास्तव  सर्वांना सुन्न करणारे आहे. अन्नाची ही नासाडी रोखण्यासाठी जैन समाजातील तरुण गेल्या काही वर्षांपासून प्रबोधन करत आहेत. 

‘हे देवा, हे अन्न तुझ्या चरणी अर्पण करून तुझा प्रसाद या भावाने मी ग्रहण करत आहे या प्रसादातून मला शक्ती व चैतन्य मिळू दे, ’अशी प्रार्थना करून मग भोजनास सुरुवात केली जाते, मात्र दुसरीकडे अन्नाची नासाडी केली जात आहे. भारतासारख्या देशाचा विचार करता कित्येक कोटी लोकांना दोन वेळचे पुरेसे अन्न मिळत नाही. दुसरीकडे लग्न, समारंभ, विविध कार्यक्रमांत, तसेच अनेक घरांमध्ये अन्नाची होत असलेली नासाडी हा गंभीर प्रश्न ठरतो. मुळात अन्न वाया घालवण्याने किंवा त्याची नासाडी केल्यामुळे अनेक नैसर्गिक स्रोतांचीदेखील नासाडी होते. अन्नधान्याच्या उत्पादनासाठी वीज, पाणी, खते, कीटकनाशके, इंधन, मनुष्यबळ अशा कित्येक गोष्टींचा वापर केला जातो, त्यामुळे अप्रत्यक्षपणे त्याचीही नासाडी आपण करतो . ‘फूड अँड अ‍ॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन’ची आकडेवारी पाहता जगभरात 1.3 अब्ज टन अन्न वाया जाते. याचा अर्थ असा की, जागतिक अन्नधान्य उत्पादनाच्या एक तृतीयांश अन्न फेकून दिले जाते. ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’च्या अहवालात लग्न समारंभात अन्न मोठ्या प्रमाणावर वाया जात असल्याचे म्हटले आहे. अन्नधान्याच्या उत्पादनात सातत्याने होत असलेली घट आणि वाढती दरवाढ लक्षात घेता ही नासाडी थांबवण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.  त्यासाठी तरुण पिढीने पुढे येण्याची गरज लक्षात घेऊन जैन समाजातील काही तरुण याकामी पुढे सरसावले आहेत.  

तूर्तास जैन समाजाचे दीक्षा ,चातुर्मास ,पर्युषण कार्यक्रम तसेच समाजातील युवा, युवतींच्या लग्न समारंभात अन्नाची नासाडी टाळण्यासाठी त्यांनी जणू चळवळच हाती घेतली आहे. मनोज सेलोत, विजय बलदोटा, संतोष कर्णा वट, मनोज सोलंकी, आकाश राठोड, जयकुमार ओस्तवाल, संकेत पोकर्णा, नितीन वेदमुथा यांचा त्यात पुढाकार आहे.  जैन समाजातील हे तरुण दीक्षा, चातुर्मास, पर्युषण, लग्न समारंभात जाऊन थांबतात. लोकांनी भोजन घेताना हवे तेवढेच ताटात घ्यावे, अन्नाची नासाडी करू नये, उष्टे अन्न टाकू नये यासाठी हे तरुण प्रबोधन करतात. जैन समाजातील तरुणांनी आपल्या समाजापुरता सुरू केलेला हा उपक्रम इतरही तरुणांसाठी अनुकरणीय असाच आहे.

...म्हणून उष्टेही खातो

या उपक्रमासंदर्भात मनोज सेलोत यांना विचारले असता ते म्हणाले, भाताच्या चार दाण्यात एका चिमणीची भूक भागते. देशात अनेक लोकांना उपाशी झोपावे लागते. अन्न पिकविण्यासाठी शेतकर्‍याला कष्ट घ्यावे लागतात. आपल्याला या अन्नाची नासाडी करण्याचा काहीही अधिकार नाही. म्हणूनच आम्ही प्रबोधन करत आहोत. अन्न वाया जाऊ नये म्हणून प्रसंगी आम्ही ते उष्टे खाऊन घेतो.त्यातून सर्व समाजाशी बंधुत्वाचे नाते निर्माण होते. भविष्यात ती व्यक्‍ती अन्नाची नासाडीही करत नाही. लवकरच पाणी वाचवा उपक्रमही हाती घेणार असल्याचे सेलोत म्हणाले.