Thu, Jul 18, 2019 10:08होमपेज › Pune › वादात मध्यस्थी केल्याने तरुणावर खुनी हल्ला

वादात मध्यस्थी केल्याने तरुणावर खुनी हल्ला

Published On: Jan 19 2018 1:55AM | Last Updated: Jan 19 2018 12:57AMपुणे : प्रतिनिधी 

तीन दिवसांपूर्वी मित्राचे इतर तरुणांशी झालेले भांडण मिटविण्यासाठी मध्यस्थी केल्याच्या कारणावरून दहा ते बारा जणांच्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच परिसरातील वाहनांची तोडफोड करत गोंधळ घातला. यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दहा ते बारा जणांवर दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

सुरज कांबळे (22, पर्वती दर्शन) या तरुणाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. तर सोन्या उर्फ विराज खंडागळे, मोन्या खंडागळे तसेच त्यांचे इतर दहा ते बारा साथीदार (सर्व रा. घोरपडे पेठ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरज कांबळे हा तरुण पर्वती दर्शन येथे राहण्यास आहेत. तर त्याचा मित्र अभिजित अडागळे हा देखील पर्वती पायथा येथे राहण्यास आहे. तो एका पंक्‍चरच्या दुकानात कामाला आहे.

दरम्यान अभिजीत अडागळे याचे घोरपडे पेठेतील एका मुलीवरून तीन दिवसांपूर्वी सोन्या खंडागळे याच्याशी भांडण झाले होते. त्यांच्यातील भांडण मिटविण्यासाठी सुरज कांबळे याने मध्यस्थी केली. दरम्यान सुरज कांबळे हा त्याच्या मित्रांसह पुणे-सातारा रोडवरील एस. टी. कॉलनी येथे बुधवारी रात्री अकराच्या सुमारास उभे होते. त्यावेळी सोन्या खंडागळे त्याच्या दहा ते बारा साथीदारांना घेऊन तेथे आला.

त्यावेळी त्यांनी दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याचे मित्र तेथून पळून गेले. मात्र टोळक्याने सुरज कांबळे याच्यावर कोयत्याने वार केले आणि त्याला गंभीर जखमी करून वस्तीतील वाहनांची तोडफोडही केली. त्यानंतर सर्वजण तेथून पसार झाले. सुरज कांबळे याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी  सोन्या उर्फ विराज खंडागळे, मोन्या खंडागळे व इतर साथीदारांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) के. व्ही. इंदलकर करत आहेत.