Sun, Jun 16, 2019 02:12होमपेज › Pune › स्थायीच्या अध्यक्षपदासाठी मुळीक - दुधाने रिंगणात

स्थायीच्या अध्यक्षपदासाठी मुळीक - दुधाने रिंगणात

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 04 2018 1:15AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे वडगावशेरीचे आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक आणि राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस आघाडीच्या लक्ष्मीबाई दुधाने निवडणुक रिंगणात असून या दोघांमध्ये अध्यक्षपदाची लढत होणार आहे. स्थायीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याचा शनिवारी अखेरचा दिवस होता, त्यामुळे दोन्ही नगरसेवकांनी आपापले अर्ज दाखल केले. दरम्यान शेवटपर्यंत भाजपचे उमेदवार राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू सुनिल कांबळे यांनी मिळणार असल्याची चर्चा भाजपसह सर्वच पक्षातील जाणकार करत होते. ऐनवेळी कांबळे यांचा पत्ता कट करत मुळीक यांनी अध्यक्षपदाची उमेदवारी खेचून आणली. यानिमित्ताने पक्षांतर्गत गटबाजीमध्ये पुन्हा एकदा बापट गटाने बाजी मारली आहे.

महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असल्यामुळे मुळीक यांची अध्यक्षपदी निवड ही केवळ औपचारिकता राहिली आहे. भाजपकडून अनुभवी नगरसेवकाला संधी देण्यात येईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे सुनिल कांबळे यांची निवडीचे आडाखे सर्वांनी बांधले होते. असे असताना भाजपने नेहमीप्रमाणे धक्का तंत्राचा वापर केला आहे. नगरसेवक पदाची दुसरीच टर्म असलेले योगेश मुळीक यांचे नाव स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी जाहिर केले. पालकमंत्री गिरीष बापट यांचे खंदे समर्थक म्हणून मुळीक ओळखले जातात. मुळीक यांची उमेदवारी घोषीत होताच महापालिकेत पालकमंत्री बापट यांचा विजय असो अशा घोषणा घुमु लागल्या. येत्या 7 मार्चला स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद असलेल्या वडगांवशेरीतून 2012 च्या पालिका निवडणुकीत पहिल्यांदा योगेश मुळीक निवडूण आले. मुळीक कुटुंब पहिल्यापासून भाजप समर्थक आहे. आमदार जगदीश मुळीक हे शहर भाजपमध्ये पदाधिकारी असताना त्यांनी 2012 च्या पालिका निवडणुकित स्वतः न उतरता बंधू योगेश मुळीक यांना निवडणुक रिंगणात उतरविले होते. त्यावेळेस योगेश मुळीक हे खरे तर विजेत्यांच्या स्पर्धेत नव्हते, मात्र, शिवसेना आणि काँग्रेसच्या लढाईत अनपेक्षीतपणे मुळीक यांनी बाजी मारली होती. 

कांबळेंची नाराजी कशी दूर करणार 

चिट्टीद्वारे निवृत्त होणार्‍या भाजपच्या सदस्यांची नावे आणि त्यानंतर निवडण्यात आलेल्या सदस्यांची नावे पाहता सुनली कांबळे हेच अध्यक्षपदाचे दावेदार असल्याचे सर्वत्र बोलले जात होते. मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट करत योगेश मुळीक यांचे नाव जाहीर झाल्याने कांबळे समर्थक नाराज झाले आहेत. ‘कास्ट फॅक्टर’मुळे पालकमंत्र्यांनी कांबळे यांचा पत्ता कट केल्याचा आरोप कांबळे समर्थकांनी केला आहे. मुळीक यांचे नाव जाहीर होताच कांबळे यांच्या समर्थकांनी पालिका परीपरातून काढता पाय घेतला. आत्ता भाजप पक्षश्रेष्टी कांबळे यांची नाराजी कशी दूर करणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

महापालिकेत पुन्हा बापट गटाची सरशी

पालिकेमध्ये भाजपचे निवडूण आलेल्या 98 नगरसेवकांपैकी निम्म्या नगरसेवकांच्या निवडीमध्ये खासदार संजय काकडे यांचा महत्वाचा सहभाग होता.  त्यामुळे त्यांचा दबदबा पालिकेच्या राजकारणात राहिल, अशी शक्यता होती. प्रत्यक्षात मात्र, काकडे गटाच्या एकाही नगरसेवकास आत्तापर्यंततरी एकही महत्वाचे पद दिले नाही. स्थायीमध्येही खा. काकडे गटाला कोणतेही स्थान मिळाले नाही. बहुतेक सदस्य बापट गटाचेच निवडण्यात आले. आध्यक्षपदासाठीही बापट यांचे खंदे समर्थक असलेले मुळीक यांची निवड झाल्याने पुन्हा एकदा बापट गटाची सरशी झाली आहे.