Thu, Jun 20, 2019 00:36होमपेज › Pune › तीन तास पाण्याखाली योग!

तीन तास पाण्याखाली योग!

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 22 2018 1:59AMपुणे : प्रतिनिधी

स्कूबा डायव्हिंगच्या क्षेत्रात विविध टप्पे पार करणारी सोळा वर्षीय खुशी परमार हिने हा विक्रम आंतरराष्ट्रीय योग दिनाचा योग साधत तब्बल तीन तास पाण्याखाली राहून, विविध योगासने करीत, नवा आशियाई विक्रम प्रस्थापित केला आहे.

टिळक जलतरण तलावावर सकाळी 9.30 ते 12.37 या तीन तास 7 मिनिट 40 सेकंदांमध्ये सतत पाण्याखाली राहून खुशीने विविध योगासने केली. तिने यापूर्वीचा तिचा दोन तासांचा विक्रम मोडला असून, नवीन आशियाई विक्रम करणारी ती पहिली युवती ठरली आहे. खुशीच्या नावावर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस, एशिया बुक ऑफ रेकॉर्डस, युनिक वर्ल्ड रेकॉर्डस, इंडियन यंग अचिव्हरचे विक्रम नोंदले गेले. 
खुशीने ‘लेक वाचवा... लेक शिकवा’ असे संदेश देत, मुली निर्भय असतात हा संदेश देखील या निमित्ताने दिला आहे. बॅराकुडा डायव्हिंग (इंडिया), फिनकिक अ‍ॅडव्हेंचर यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला होता. विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. खुशी वयाच्या नवव्या वर्षापासून स्कूबा डायव्हिंग शिकते आहे. गोवा येथे सन 2016 मध्ये एकूण 11 तास 30 मिनिटे ओपन सी वॉटर स्कूबा डायव्हिंग करून ‘लाँगेस्ट स्कू बा डायव्हिंग इन अ विक’चा विक्रम नोंदवला. 2016 मध्ये टिळक जलतरण तलावावर ‘लार्जेस्ट अंडर वॉटर अ‍ॅक्टिविटी’ या उपक्रमाचा विक्रम पूर्ण केला होता. 

हा विक्रम करून आनंद झाला आहे. विशेष म्हणजे माझाच विक्रम मी मोडला आहे. माझे वडील अजित परमार, आई आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच हा विक्रम करण्याचे मनोधैर्य मिळाले. तीन तासांनंतर थंडी वाजू लागल्याने प्रशिक्षकांच्या सल्ल्याने हा उपक्रम थांबविला.    

- खुशी परमार