Thu, Jul 18, 2019 17:17होमपेज › Pune › शहरात योग दिन उत्साहात

शहरात योग दिन उत्साहात

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 22 2018 12:25AMपिंपरी : प्रतिनिधी

औद्योगिकनगरीत गुरुवारी (दि.21) उपनगरासह विविध भागात सामाजिक संस्था व विविध राजकीय संघटनांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व वयोगटातील योग साधकांनी योगाभ्यासाचे धडे गिरवले. योगाभ्यासादरम्यान विविध आसने तसेच पाण्याखालील योगासने यासह नवनवीन योगप्रकारांचा सराव करण्यात आला.  

क्रांतिवीर चापेकर वाड्यात सामूहिक योग साधना

चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, सोहम योग साधना व आपले चिंचवड व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिवीर चापेकर वाड्यात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी 350 जणांनी सामुहिक योग साधना केली.यावेळी खासदार अमर साबळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख मिलिंदराव देशपांडे, विनायकराव थोरात, क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, सतीश गोरडे, रवी नामदे आदी उपस्थित होते.  यावेळी योग शिक्षकांनी उपस्थितांना योगाचे धडे दिले. यामध्ये पूरक हालचाली, सूर्य नमस्कार, आसने, प्राणायामाचा योगाभ्यास करण्यात आला. पूरक हालचालींमध्ये खांदा, कंबर, गुडघा, मानेचा व्यायाम, भद्रासन, भुजंगासन, दंडासन, ताडासन, नटराजासन, वीरभद्रासन, पतंगासन, पवनमुक्तासन आदी योगासने करण्यात आली. प्रास्तविक सतीश गोरडे यांनी केले.कार्यक्रमाचे संयोजन सिद्धेश्वर इंगळे व अतुल आडे यांनी केले.