Thu, Jun 27, 2019 11:44होमपेज › Pune › केवळ योगदिनीच योगाभ्यासाचे धडे

केवळ योगदिनीच योगाभ्यासाचे धडे

Published On: Jun 21 2018 1:23AM | Last Updated: Jun 21 2018 12:22AMपिंपरी : प्रतिनिधी

पूर्वी 50 वर्षांपुढील नागरिकांनीच योगा करावा अशी समजूत होती. परंतु हल्ली योगाचे महत्त्व वाढले असून पाच वषार्ंपासून ते 80 वर्षांपर्यंत प्रत्येक व्यक्ती योगाभ्यास करत आहे. केंद्र शासनाने राज्य सरकारांना  योगाभ्यासाचे महत्त्व लक्षात घेऊन शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, महापालिकेच्या शाळांमध्ये या आदेशालाच केराची टोपली दाखवण्यात येत आहे. खासगी शाळांच्या तुलनेत महापालिकेच्या बोटावर मोजण्याइतक्या शाळांमध्येच केवळ योगदिनीच योगाभ्यासाचे धडे गिरवण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

2014 पासून भारताच्या संस्कृतीचे अविभाज्य अंग असलेल्या योगाभ्यासाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व प्राप्त झाले असून 21 जून हा आता आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जात आहे.  सध्या योगाला स्पर्धात्मक स्वरुप प्राप्त झाले असून स्पर्धात्मक योगासनामुळे शहरात योगासन हा क्रीडाप्रकार झपाट्याने वाढत आहे. मात्र, याबाबत महापालिकेच्या शाळा वगळता खासगी शाळांमधे वर्षभर योगाचे वर्ग घेण्यात येतात. महापालिकेची याबाबत उदासीनता दिसून येत असून केवळ आंतरराष्ट्रीय योग दिनालाच महापालिकेचा क्रीडा विभाग खडबडून जागा होत आहे.

मात्र शहरातील विविध भागात याउलट स्थिती असून पाच वर्षांच्या बालकापासून 80 वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत नियमितपणे योगासने करणारे हजारो साधक तयार झाले आहेत.  विविध खासगी संस्था तसेच आयटी कंपन्यांमध्ये वर्षभर योग वर्ग घेतले जातात. मात्र महापालिकेच्या शाळांमध्ये  केवळ योगदिनालाच हा अभ्यास करण्यात येतो, अशी माहिती शहरातील योगतज्ज्ञांनी दिली. 

शासकीय स्तरावर योगाच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यात महापालिकेच्या एक किंवा दोन बोटावर मोजण्याइतक्या शाळाच सहभागी होतात. तसेच, खासगी शाळांचा यात उत्स्फूर्त प्रतिसाद असतो.

राष्ट्रीय आतंरराष्ट्रीय पातळीवर विविध नवीन योग प्रकारात प्रावीण्य मिळवून खासगी शाळांनी योगाचे धडे गिरवले आहेत. मात्र, महापालिकेच्या शाळांमधील मुले योगा शिकण्यास उत्सुक नाही. त्यामुळे वषर्र्भर योगाचे प्रयोजन कोलमडले आहे, अशी माहिती क्रीडा विभागाच्या एका अधिकार्‍याने दिली. 

खासगी शाळांमध्ये दिवसेंदिवस योगाचे महत्त्व वाढत असून योग समितीच्या वतीने तेथे योगाभ्यास शिकवण्यात येत आहे. महापालिकेच्या वाकड येथील शाळेत योगाभ्यास शिकवला जातो. महापालिकेच्या शाळांमध्ये केवळ योगदिनीच योगासनांची प्रात्यक्षिके तसेच योगाभ्यास शिकवण्यात येतो. - मिलिंद वालझाडे, जिल्हा प्रभारी, पतंजली योग समिती

महापालिकेच्या शाळांमध्ये सध्या योगशिक्षक नाहीत. शाळेत योगाचे तास घेतले जात नाहीत. खेळाच्या तासाला सूर्य नमस्कार तसेच काही योगासने शिकवली जातात. क्रीडा विभागाकडून योग शिक्षकांची भरती केली जात नाही. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त सामूहिकरित्या योगदिन साजरा करण्यात येणार आहे. तसे परिपत्रक काढण्यात आले असून सकाळ व दुपारच्या वेळा सांभाळून योगदिनानिमित्त योगाभ्यास घेतला जाणार आहे. - राजेश जगताप, प्रशासन अधिकारी, क्रीडा विभाग