Tue, Apr 23, 2019 21:34होमपेज › Pune › विद्यापीठामध्ये होणार योग अध्यासन

विद्यापीठामध्ये होणार योग अध्यासन

Published On: Aug 03 2018 1:37AM | Last Updated: Aug 03 2018 12:42AMपुणे : प्रतिनिधी

योगाचे ज्ञान सर्वदूर नेता यावे आणि त्याचा एक जीवनशैली म्हणून अभ्यास करता यावा, या भूमिकेतून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये नवीन योग अध्यासन सुरू करण्यात येत आहे, अशी घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केली. न्यायरत्न विनोद यांच्या नावाने योगअभ्यास व संशोधनासाठी स्वतंत्र विशेष शिष्यवृत्तीही सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

निमित्त होते, 75 व्या व्यासपूजा महोत्सवाचे. महर्षि विनोद रिसर्च फाउंडेशन आणि महर्षि विनोद सिद्धाश्रम सेवा मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेचे सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर, योगसंशोधक डॉ. एम. जे. भोळे आदी मान्यवर उपस्थित होते. योगी डॉ. संप्रसाद विनोद यांनी मुक्तचिंतनातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी कुलगुरु म्हणाले, पुणे विद्यापीठातील अध्यासनांमधील रिक्त पदे भरण्यासाठी चांगल्या माणसांचा शोध घेत आहोत. त्या पार्श्वभूमीवर येत्या 25 ऑगस्टपासून विद्यापीठामध्ये नवीन योग अध्यासन सुरू करण्यात येणार आहे. 

परिवहन मंत्री रावते म्हणाले, माझ्या जीवनात दोन महत्त्वाच्या व्यक्ती आल्या. एक म्हणजे महर्षि विनोद आणि दुसरे म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. यांच्यामुळे माझ्या जीवनात अमूलाग्र परिवर्तन झाले आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. न्यायरत्न विनोद यांनी आम्हाला जे गुरुबळ दिले, त्यामुळे कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत आम्ही उभे राहू शकतो. डॉ. विनोद या वेळी म्हणाले, खरा गुरू हा तुम्हाला स्वतंत्र करतो. अज्ञानाचे निराकरण ही मुलभूत गोष्ट आहे व सातत्यपूर्ण चालणारी गोष्ट आहे हे ज्याला समजते तो गुरू कधीही अभिनिवेश आणून जगत नाही. समन्वय विनोद या विशेष युवकाचे तबलावादन झाले. अ‍ॅड. अदिती वैद्य यांनी प्रास्ताविक केले. श्यामसुंदर बापट, भारती विद्या भवनचे संचालक नंदकुमार काकीर्डे यांनी मनोगत व्यक्त केले. मुक्ता भगत आणि वैशाली गिरीबट्टणवार यांनी सूत्रसंचालन केले.