Thu, Jun 20, 2019 21:13होमपेज › Pune › लोहगाव पाणीपुरवठा केंद्रात अपहार?

लोहगाव पाणीपुरवठा केंद्रात अपहार?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

येरवडा  : वार्ताहर 

लोहगाव येथील मुख्य चौकात पाण्याच्या टाकीजवळ बसविण्यात आलेल्या स्वयंचलित मशीनमध्ये दैनंदिन जमा होणार्‍या पैशाचा भरणा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे झाला नाही.  रोज सुमारे अंदाजे दहा हजार लिटर पाणी पाच रूपयाचे कॉईन टाकून नागरीक नेतात. त्यामुळे सुमारे दोन ते तीन हजार रूपये रोज मशीनमध्ये जमा होतात. गेल्या चार महिन्यांपासून याचा भरणाच केला नसल्यामुळे या लाखो रूपयांचा पैशांमध्ये मोठा अपहार झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोहगाव येथील मुख्य चौकात  असणार्‍या पाणीपुरवठा केंद्राजवळ पाण्याच्या टाकीला स्वयंचलति मशीन बसविण्यात आली आहे. या स्वयंचलित मशीनमध्ये पाच रूपयाचा कॉईन टाकल्यानंतर वीस लिटर पाणी बाहेर येते. सदरचे महापालिकेचे पाणी पिण्यायोग्य असल्यामुळे ते भरण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोज रांगा लागलेल्या असतात. सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत याठिकाणी पाणी भरण्यासाठी रांगा असतात. याअगोदर रोज मशीनमध्ये जमा होणार्‍या पैशाचा भरणा ग्रामपंचायतीमध्ये केला जात होता. मात्र लोहगावचा समावेश ऑक्टोबर महिन्यात झाला आहे.

तेव्हापासून दैनंदिन मशीन मध्ये जमा होणारे दोन ते तीन हजार रूपये जमा न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे लाखो रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी देखील याकडे लक्ष दिले नाही की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले याचा तपास होणे आवश्यक आहे.  त्यांच्या ज्यावेळी पत्रकारांनी निर्दशनास आणून दिल्यानंतर आपण दुसर्‍या दिवशी जावून मीटर तपासून पैसे जमा करून घेणार असल्याचे उत्तर मिळाले. चार महिन्यांपासून अधिक काळ रोखीच्या पैशाचे त्याठिकाणी असणारे वॉलमन कर्मचारी अपहार करत असल्याचा संशय काही सामाजिक संस्थांनी व्यक्त केला आहे.

गेल्या चार महिन्यांपासूनचा सुमारे तीन लाखाहून अधिक रक्कमेचा भरणा कर्मचारी करणार का असा देखील प्रश्‍न उपस्थित होत आहे. असा अपहार करण्यामध्ये केवळ वॉलमन सहभागी असणार नाही तर इतर कर्मचारी व पाणीपुरवठ्याचे अधिकारी देखील सहभागी असून त्यांच्यावर काय  कारवाई करणार असा देखील प्रश्‍न काही सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी विचारला आहे. पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अधिकारी, महापालिका आयुक्तांनी या अपहार प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी यानिमित्ताने होत आहे. 

याबाबत महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता दत्तात्रय तांबारे म्हणाले, महापालिकेत समावेशानंतर स्वयंचलित मशीनमधील पैशाचा भरणा झालेला नाही हे खरे आहे. मात्र त्याचा सर्व हिशोर वॉलमन जवळ आहे. आपण रिडींगनुसार वॉलमन कर्मचार्‍यांकडून  पैसे भरून घेणार आहोत.
 


  •