होमपेज › Pune › लोहगावचा ‘डीपी’ रखडला 51 वर्षे

लोहगावचा ‘डीपी’ रखडला 51 वर्षे

Published On: Jan 06 2018 1:40AM | Last Updated: Jan 05 2018 11:40PM

बुकमार्क करा
 येरवडा ः वार्ताहर

लोहगाव हे 1966 पासून पुणे महानगरपालिकेत आहे. याला सुमारे 51 वर्षे उलटून गेली तरीदेखील समाविष्ट झालेल्या गावाचा विकास आराखडाच (डीपी) झाला नाही. त्यामुळे हा भाग विकासापासून वंचित असल्याने येवलेवाडीसारखाच केवळ लोहगावचा स्वतंत्र विकास आराखडा मंजूर करावा, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक बापूराव कर्णे-गुरुजी यांनी महापालिकेकडे केली आहे. कर्णे-गुरुजी म्हणाले, देशाच्या संरक्षणासाठी पुण्यात विमानतळाची गरज असल्याचे आवाहन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. त्यावेळी लोहगावच्या शेतकर्‍यांनी 3200 एकर जमीन नाममात्र 90 रुपये प्रतिएकर दराने विमानतळासाठी दिली. या जमिनीचे पैसेसुध्दा अनेक वर्षांनी टप्प्या-टप्प्याने मिळाले.

त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी विमानतळाच्या सभोवतालचा लोहगावचा भाग पुणे महानगरपालिकेत घेऊन विमानतळाच्या सभोवतालच्या नागरीकांना तातडीने नागरी सुविधा देण्याची मागणी केंद्र सरकारला केली. केंद्र सरकारने ही मागणी योग्य असल्याची खात्री करून लोहगाव विमानतळाच्या सभोवतालचा भाग पुणे महानगरपालिकेत घेण्याचे व त्यांना पुणे महानगरपालिकेप्रमाणे सर्व नागरी सुविधा देण्याचे राज्य सरकारला आदेश दिले. राज्य सरकारने सर्व प्रक्रिया पूर्ण करून विमानतळाच्या सभोवतालचा लोहगावचा 7.66 चौरस किलोमीटर इतका भाग 1966 मध्ये पुणे महानगरपालिकेत समाविष्ट केल्याचे महानगरपालिकेला कळविले. 

असे झाले असले तरी, या भागाला नागरी सुविधा 2017 पर्यंत मिळाल्याच नाहीत. कारण या भागाचा विकास आराखडाच न केल्याने गेल्या 51 वर्षात पुणे महानगरपालिका खातेप्रमुखांच्या शिफारशीने आयुक्तांच्या बजेटमध्ये 1 रुपयाही विकासासाठी मिळाला नाही. या भागात विकास करण्याचे पुणे महानगरपालिकेने प्लॅनिंग केले नाही. त्यामुळे या भागात शहरीकरणाच्या कोणत्याही नागरी सुधारणा झाल्या नाहीत. वास्तविक पाहता एखादे गाव महानगरपालिकेच्या हद्दीत आल्यावर तातडीने या भागाचा विकास आराखडा करून विकास करण्याचे नियोजन केले जाते व विकास आराखडा करण्याअगोदर त्या भागातील बांधकामे नियमित करण्यासाठी गुंठेवारी कायद्यानुसार कार्यवाही होते. लोहगावची जुनी हद्द पालिकेत आली. परंतु 2017 मध्ये पहिला डी. पी. मंजूर झाला आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांमध्ये लोहगावच्या उर्वरित भागाचा समावेश झाला.