Mon, Jun 17, 2019 02:10होमपेज › Pune › प्राधिकरणात यशवंतराव चव्हाण स्मृती स्मारक

प्राधिकरणात यशवंतराव चव्हाण स्मृती स्मारक

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 17 2018 12:34AMपिंपरी : प्रतिनिधी  

कै. यशवंतरावजी चव्हाण स्मारक समितीच्या वतीने प्राधिकरण, निगडीतील संत तुकाराम महाराज उद्यानाशेजारी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरराव चव्हाण यांचे भव्य स्मारक उभे केले जात आहे. येथील 4 हजार 40 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत उभ्या राहणार्‍या या स्मारक इमारतीसाठी  पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीने 5 कोटी रुपयांचे अर्थसहाय बुधवारी (दि.16) मंजूर केले.

समिती सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व अहमदनगर या जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने कै. यशवंतरावजी चव्हाण स्मारक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने त्याचे स्मारक उभारण्यात येत आहे. चव्हाण यांनी महाराष्ट्रभर राबविलेल्या औद्योगिक धोरणामुळेच पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रात छोटे-मोठे उद्योगधंदे सुरू झाले. त्यामुळे शहर परिसराचे औद्योगिक वसाहतींमध्ये रूपांतर झाले आहे. त्यांच्यामुळेच औद्योगिकनगरी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारूपास आली आहे. चव्हाण यांनी राबविलेल्या औद्योगिक व सहकार धोरणांमुळेच लाखो हातांना रोजगार मिळाला. अनेक उद्योगांना चालना मिळाली. त्यांच्या कार्याची प्रेरणा व स्फूर्ती भावी पिढीतील युवकांना मिळावी म्हणून त्यांचे शहरात स्मारक उभे करण्याचे समितीने ठरविले आहे.

निगडी, प्राधिकरणातील सेक्टर दोनमधील जागेत चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा उभा केला जाणार आहे. त्यामध्ये 1 हजार आसन क्षमतेचे सांस्कृतिक भवन, गोरगरीब व अनाथ विद्यार्थ्यांसाठी 16 खोल्यांचे अभ्यासिका व वसतीगृह, 40 आसन क्षमतेचे कॉन्फरन्स हॉल, ग्रंथालय व वाचनालय, व्यायामशाळा, डायनिंग हॉल आणि योग प्रशिक्षण व उपचार केंद्र असणार आहे.
स्मारकासाठी पालिकेने 5 कोटींचे अर्थसहाय देण्यास बुधवारी मंजुरी दिली आहे. तशी शिफारस सर्वसाधारण सभेकडे केली आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्षा गायकवाड व सदस्य विलास मडिगेरी यांनी दिली. 

स्मारकासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन

स्मारक इमारतीचे बांधकाम सुरू होऊन एक वर्षे झाले आहे. आतापर्यंत तब्बल 10 ते 15 हजार चौरस फूट क्षेत्रफळाचे बांधकाम झाले आहे. स्मारकासाठी एकूण 12 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. समितीने अडीच कोटींचा निधी जमा केला आहे. पालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी 5 कोटी अर्थसहाय मंजूर केले आहे. उर्वरित निधीचे संकलन सुरू आहे. त्यासाठी राज्य शासन, दानशूर संस्था व व्यक्तींकडून अर्थसहाय्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिक व संस्थांनी या स्मारकास मदत करावी, असे आवाहन समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, शंकरराव शिर्के, सुनील शिंदे यांनी केले आहे.