Tue, Mar 19, 2019 03:11होमपेज › Pune › अवसायनातील यशवंत कारखान्याबाबत ‘जैसे थे’चा आदेश 

अवसायनातील यशवंत कारखान्याबाबत ‘जैसे थे’चा आदेश 

Published On: Aug 30 2018 5:13PM | Last Updated: Aug 30 2018 5:10PMपुणे : प्रतिनिधी

थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याचे दाखवत शेतकर्‍यांच्या मालकीचा कारखाना अवसायानात काढण्यात आला. त्याबाबतच्या पुणे प्रादेशिक साखर सह संचालकांच्या आदेशास शेतकरी सभासद पांडुरंग काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर सुनावणी झाली असता अवसायनातील यशवंत कारखान्याबाबत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे अंतरिम आदेश देण्यात आले. तर याबाबत पुढील सुनावणी ११ सप्टेंबरला होणार आहे. 

उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती  रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर याबाबतची सुनावणी होऊन या प्रकरणी शासनाला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत. पांडुरंग काळे यांच्या वतीने अ‍ॅड अभिजीत कुलकर्णी यांनी बाजू मांडली. याचिकेत नमूद केल्यानुसार २०११ पर्यंत लोकनियुक्त संचालक मंडळ कारखान्याचे कामकाज बघत होते. २ एप्रिल २०११ रोजी कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर, यशवंत कारखान्याची सर्वसाधारण निवडणूक कधीही घेण्यात आली नाही. 

यावर मार्ग काढण्यासाठी ११ फेब्रुवारी २०१२ रोजी कारखान्याची सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आणि कारखान्याची काही जमीन विकून सुमारे १२१.११ कोटी एवढा निधी जमा होऊ शकतो. म्हणून, काही जमीन विकून कारखाना कर्जमुक्त करण्याचा व परत कारखाना सुरु करण्याचा ठराव करण्यात आला. शासनाकडे याबाबत पाठपुरावा सुरु झाला. त्यास अनुसरून २५ ऑक्टोंबर २०१७ रोजी प्रादेशिक सह-संचालक(साखर) शशिकांत घोरपडे यांनी शासकीय लेखापरिक्षक असलेले प्रकाश घोडके यांनाच कारखाना अवसायानात का घेऊ नये? अशी कारणे दाखवा नोटीस दिली व अंतरिम अवसायक नियुक्तीचा एकतर्फी आदेश पारित केला असता यशवंतच्या सभासदांनी घोरपडे यांच्याकडे हरकती दाखल केल्याचे नमुद केले आहे.

सुमारे २० हजारांहून अधिक शेतकरी-सभासदांच्या हितासाठी सहकारी तत्वावर यशवंत कारखाना सुरु करण्यात आला. पुणे शहराच्या नजीक 248 एकर जमिनीची किंमत नाममात्र 2 कोटी 51 लाख रुपये एवढी असल्याचा दस्तऐवज तयार करणे. या बाबींमुळे यशवंत कारखान्याची अवसायन प्रक्रिया एक कारस्थान असून या सर्व गैरप्रकाराला लगाम घालण्यासाठी पांडुरंग काळे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिल्याचेही पांडे यांनी सांगितले.