Sun, Jul 21, 2019 09:55



होमपेज › Pune › अखेर ‘यशवंत’ कारखान्याचे धुराडे पेटणार

अखेर ‘यशवंत’ कारखान्याचे धुराडे पेटणार

Published On: May 21 2018 1:35AM | Last Updated: May 21 2018 1:24AM



पुणे ः किशोर बरकाले

हवेली तालुक्यातील थेऊर येथील ‘यशवंत’ सहकारी साखर कारखाना राज्य सहकार विकास महामंडळामार्फत चालू करण्याचे निश्‍चित झाले आहे. त्यामुळे हंगाम 2018-19 मध्ये अखेर ‘यशवंत’चे धुराडे पेटण्याची आशा निर्माण झाली आहे. तसा ठराव महामंडळाच्या 7 मे रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्य झाला आहे. कारखाना सुरू करण्यास पहिल्या टप्प्यात लागणार्‍या खर्चापोटी 2 कोटी 31 लाख रुपयांचा निधी महामंडळाने देण्याचा प्रस्ताव कारखान्याच्या अवसायकांनी दिला आहे. त्यावर लवकरच पुढील कार्यवाही सुरू होण्याची अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले.

राज्यातील आजारी असलेल्या 28 साखर कारखान्यांपैकी पहिल्या टप्प्यात 8 कारखाने सुरू करण्यावर राज्य सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. याबाबतचा अहवाल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने(व्हीएसआय)डिसेंबर 2017 मध्ये तयार केला आहे. त्यानुसार यशवंत सहकारी साखर कारखान्याचा सन 2018-19 चा गाळप हंगाम सुरू करायचा असल्याचे अवसायक बी. जे. देशमुख यांनी साखर आयुक्तालयास कळविले आहे. त्यानुसार एकूण 48 कोटी 23 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. त्याचा तपशिलवार प्राथमिक खर्चही प्रस्तावात लिहिलेला आहे. हंगामापूर्वी कारखान्याच्या देखभाल व दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करण्यासाठी सद्य:स्थितीत वीजजोडणी, पाणीपुरवठा पूर्ववत करणे आदी आवश्यक कामांसाठी तातडीने 2.31 कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. 

याबाबत पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक शशिकांत घोरपडे यांच्याकडे कारखान्याचा  प्रस्ताव 27 फेब्रुवारी रोजी प्राप्त झाला आणि त्यांनी 7 मार्च रोजी साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला आहे. त्यानुसार साखर आयुक्तांनी महामंडळास 14 मार्च रोजी निधी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे म्हणाले, यशवंत सहकारी साखर कारखान्यास आर्थिक मदत करण्याचा प्रस्ताव मिळाला असून महामंडळाच्या संचालक मंडळाच्या 7 मे रोजीच्या बैठकीत आर्थिक मदत करण्याचा निर्णय झाला आहे. आवश्यकतेप्रमाणे रक्कम महामंडळ स्वतःच खर्च करणार आहे. याबाबतची पुढील कार्यवाही लवकरच सुरू होईल.