Sat, Jul 20, 2019 10:36होमपेज › Pune › यशराजच्या कर्तृत्वाला मिळाली दातृत्वाची साथ

यशराजच्या कर्तृत्वाला मिळाली दातृत्वाची साथ

Published On: Jun 29 2018 12:57AM | Last Updated: Jun 28 2018 11:07PMपिंपरी : प्रतिनिधी

दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत चिंचवडच्या आंबेडकरनगरमध्ये राहणार्‍या यशराज वाघमारे याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून 97.20 टक्के गुण मिळविले आहेत. ही बातमी दै. पुढारीने प्रसिध्द केली होती. ती बातमी वाचून यशराजचे  आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मदत करण्याची तयारी नोव्हेल ग्रूप ऑफ इन्स्टिट्युटचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे यांनी दर्शविली आहे. विद्यार्थी दत्तक उपक्रमाअंतर्गत त्याच्या ‘आयएएस’ होईपर्यंतच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे.  यशराजचे वडील बापू वाघमारे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. दोन मुलांच्या शिक्षणासाठी ते झटत आहेत. यशराजने वडिलांच्या कष्टांची जाण राखत प्रामाणिकपणे अभ्यास करून हे यश मिळविले.

या यशानंतर त्याची पुढील शैक्षणिक वाटचाल चांगली व्हावी, ही त्याच्या वडिलांची इच्छा आहे. परंतु, परिस्थिती हा त्यातला प्रमुख अडसर आहे. त्यामुळे  यशराजच्या पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी दत्तक उपक्रमातून अमित गोरखे यांनी त्याला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. त्याचे आयएएस होण्याचे स्वप्न साकार होईपर्यंत ते मदत करणार आहेत. या उपक्रमातून त्यांनी यापूर्वी देखील आर्थिक परस्थितीशी झुंज देणार्‍या विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन मदत केली आहे.यासंदर्भात यशराजचे वडील बापू वाघमारे म्हणाले, यशराजने कठीण परिस्थितीत अभ्यास करून  यश मिळवले आहे. आमच्या कुटुंबाचा भाजी विक्रीच्या व्यवसायातून उदर्निवाह होतो. मात्र, चांगल्या शिक्षणासाठी पैशाची चणचण जाणवते. त्यामुळेच यशराजला दहावीसाठी खासगी क्लासेस लावता आले नाहीत. तरीही त्याने अभ्यास केला आणि भविष्यातही त्याची चांगला अभ्यास करण्याची तयारी आहे. 

सध्या आयआयटीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी  गोरखे यांनी मदतीचा हात दिला आहे. तसेच, त्यांनी आएएस होण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत मदत करण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबावरील यशराजच्या शिक्षणाच्या खर्चाचा भार हलका झाला असून त्याला चांगल्या प्रकारे शिक्षण पूर्ण करता येणार असल्याचे समाधान आहे.