होमपेज › Pune › ‘वायसीएम’मध्ये रुग्णांची सुरक्षा वार्‍यावर

‘वायसीएम’मध्ये रुग्णांची सुरक्षा वार्‍यावर

Published On: May 12 2018 1:31AM | Last Updated: May 12 2018 1:03AMपिंपरी : प्रदीप लोखंडे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) रुग्ण सुरक्षा वार्‍यावर आहे. वॉर्डमधील रुग्णांवर रुग्णालयाचे लक्ष नसते. उपचारासाठी आलेला रुग्ण बाहेर फिरत असतात. रुग्णालयाच्या या अनास्थेमुळे गुरुवारी (दि. 10) एका रुग्णाचा रुग्णालयीन आवारात मृत्यू झाला. ‘वायसीएम’ची रुग्णांविषयी असणार्‍या या अनास्थेला आळा बसणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
महापालिकेच्या ‘वायसीएम’ रुग्णालयाच्या आवारात गुरुवारी (दि. 10) एका रुग्ण मृत अवस्थेत आढळला. हा रुग्ण बुधवारी (दि. 9) रुग्णालयातून गायब झाल्याचे नातेवाईकांनी व रुग्णालयीन प्रशासनाने सांगितले. हा रुग्ण उपचारासाठी आला असताना तो गायब कसा झाला असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला, तर आम्ही रुग्णांची पूर्ण काळजी घेत असल्याचा दिखावा रुग्णालयीन प्रशासनाकडून केला जात आहे; मात्र रुग्णांबाबत अनास्था असल्याचे चित्र आहे. या रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना रुग्णालयीन गणवेश अथवा इतर कोणतीच सुविधा दिली जात नाही. त्यामुळे रुग्णालयातील रुग्ण कोण आणि नातेवाईक कोण हेच समजत नाही. त्यामध्येच वॉर्डमधील सुरक्षारक्षक रुग्णांवर लक्ष ठेवण्यास अपयशी होत आहेत. त्यामुळे अनेक रुग्ण रुग्णालयाच्या बाहेर जात आहेत. अनेक वेळा रुग्ण गायब झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे हे रुग्णांच्या जीवावर बेतत आहे.

सर्वसामान्य रुग्णांसाठी ‘वायसीएम’ रुग्णालयात उपचाराच्या सुविधा आहेत. या ठिकाणी पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ व इतर तालुक्यांतूनही रुग्ण उपचारासाठी येत आहेत; मात्र या रुग्णालयातील डॉक्टरांकडून अनेक वेळेला रुग्णांच्या उपचाराकडे कानाडोळा केला जात आहे. अनेक गंभीर रुग्णांना इतर रुग्णालयाची वाट दाखवली जात आहे. येथील सुरक्षारक्षक भरवशाचे नसल्याची तक्रार रुग्णालयात येणारे रुग्णांचे नातेवाईक करत आहेत. त्यामुळे रुग्णालयावर वचक कोण ठेवणार असा सवाल या वेळी उपस्थित होत आहे.रुग्णालयाच्या वतीने रुग्णांची योग्य काळजी घेतली जात आहे. सुरक्षारक्षकही रुग्णांकडे काळजीपूर्वक लक्ष देत असल्याची माहिती रुग्णालयीन प्रशासनाने दिली.