Fri, Jul 19, 2019 01:49होमपेज › Pune › बारावीच्या 80 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून

बारावीच्या 80 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून

Published On: Mar 03 2018 1:45AM | Last Updated: Mar 03 2018 1:16AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकल्याने आतापर्यंत सुमारे 80 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. त्यामुळे यावर्षी बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता असून, 15 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दरम्यान, 2012 नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना मान्यता द्यावी, तसेच सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार सुरूच राहणार असल्याचे, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाद्वारे सांगण्यात आले.

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी, सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, 2 मे 2012 नंतर रुजू झालेल्या शिक्षकांच्या नियुक्तीस मान्यता देण्यात यावी, माहिती तंत्रज्ञान विषयास अनुदान देणे, 24 वषार्र्ंच्या सेवेनंतर सर्वांना निवड श्रेणी लागू करणे, शिक्षकांना शैक्षणिक सुट्टी देणे, आदी मागण्यांसाठी डिसेंबर महिन्यापासून आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, शासनाने वेळोवेळी आश्‍वासन देऊनही मागण्या मान्य न केल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी 12 वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. शासनाने आतापर्यंत मागण्यांचे आदेश न काढल्याने आंदोलनाचा आज दहावा दिवस असून, बहिष्कार आंदोलन तीव्र केले आहे.

त्यामुळे राज्यातील बारावीच्या विद्याथ्यार्र्ंचा एकही पेपर तपासण्यात आला नाही. त्यामुळे सुमारे 15 लाख विद्यार्थ्यांच्या 80 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. तसेच उत्तरपत्रिका तपासणीचे काम ठप्प झाले आहे. बारावीच्या परीक्षेदरम्यान आतापर्यंत इंग्रजी, हिंदी, मराठी, भौतिकशास्त्र, एस.पी., राज्यशास्त्र, सहकार, उर्दू, भूगर्भ शास्र या विषयांच्या मुख्य  नियामकांच्या सभाच झाल्या नाहीत. त्याचबरोबर या विषयांच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर, कोंकण (रत्नागिरी) आदी सर्व विभागातील नियमकांच्याही आजपर्यंतच्या नियोजित सभाही झाल्या नाहीत. त्यामुळे शासनाने राज्यातील 15 लाख विद्यार्थी आणि सुमारे 72 हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या हिताचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी केली आहे. 

दरम्यान, शिक्षकांच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार आंदोलनामुळे 12 वीचा निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 12 वीचा निकाल 5 जूनपूर्वी लागणे आवश्यक आहे, त्यामुळे यावर्षी उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कारामुळे ही वेळ साधली जाणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.