Thu, Jul 18, 2019 02:23होमपेज › Pune › मोशीच्या मातीतील कुस्तीचा गंध हरवतोय

मोशीच्या मातीतील कुस्तीचा गंध हरवतोय

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 17 2018 1:21AMमोशी : श्रीकांत बोरावके

लाल मातीशी इमान सांगणारी काही गावे कोल्हापूरबरोबरच पुणे जिल्ह्यातही उदयास आली. त्यात पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी गाव आघाडीवर असले तरी मोशीचेही नाव यात प्रामुख्याने घेतले जायचे.थोडक्यात गेल्या दोन दशकांपूर्वी मोशी व कुस्ती हे एक अजोड समीकरणच बनले होते. परंतु यंदाची यात्रेतील आखाड्याची स्थिती पाहता या गावची लाल मातीशी जुळलेली नाळ तुटली की काय असा प्रश्न उपस्थित होतो. अवघा तास दोन तासभर भरलेला कुस्ती आखाडा त्यात दूरवरून आलेल्या पैलवानांना कुस्ती सादर करण्यासाठी न मिळालेली संधी. मल्लांपेक्षा वस्तादांची संख्या अधिक अशी यंदाच्या यात्रेतील कुस्तीच्या आखाड्यातील स्थिती होती. 

शुक्रवारी (दि.16) रोजी आमराई मैदानात आखाडा पार पडला. या आखाड्यात केवळ सुरुवातीच्या दोन तीन कुस्त्या वगळता संपूर्ण आखड्यात गोंधळ, नियोजनाचा अभाव दिसून आला. म्हणाव्या तशा कुस्त्या न झाल्याने कुस्ती शौकिन नाराज झाले. लाखोंची उलाढाल असलेल्या नागेश्वर महाराजांच्या यात्रेत केवळ परंपरा म्हणून साध्यापद्धतीने आखाडा भरविला गेला. 

इनामी कुस्त्या ठेवण्यात आल्या नव्हत्या की जाहीर पद्धतीने इनाम ठेवण्यात आले नव्हते. यामुळे गेली अनेक वर्षे मोशीतील आखाड्यात येऊन आपली कुस्ती सादर करणारे अनेक मल्ल नाराज दिसत होते.  सर्वच नामांकित मल्लांनी या आखाड्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत होते. 

गावचा ऐतिहासिक वारसा कुस्तीबाबत समृद्ध असून गावात चार ते पाच तालमी आहेत. तेव्हाच्या काळात प्रत्येक घरटी एक पैलवान तालमीत असे. परंतु, आज मितीला याच गावातील पोरं तालमीपेक्षा जीमला प्राधान्य देत असून तालमीला कट्ट्याचे स्वरूप आले आहे.