Tue, Aug 20, 2019 05:27होमपेज › Pune › खडसे शेती करणार का? : हेमंत गवंडे 

खडसे शेती करणार का? : हेमंत गवंडे 

Published On: May 05 2018 1:21AM | Last Updated: May 05 2018 1:15AMपुणे : प्रतिनिधी

भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना भोसरीतील भूखंड खरेदीप्रकरणात एसीबीने क्‍लीन चिट दिल्यानंतर तक्रारदार हेमंत गवंडे यांनी विविध प्रश्‍न उपस्थित केले आहेत. खडसे आता काय एमआयडीसीत शेती करणार, की कोणता उद्योग उभारणार आहेत, असा प्रश्‍न एसीबीसमोर उपस्थित केला आहे. शुक्रवारी एसीबीने ‘क’ समरी अहवाल विशेष न्यायालयात सादर केला आहे. त्यावर गवंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

भोसरी येथील 40 कोटींहून अधिक किमतीचा 1 हेक्टर 21 गुंठ्यांचा भूखंड, पावणेचार कोटींना खरेदी केल्याप्रकरणी हेमंत गवंडे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीची दखल न घेतल्याने उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली. त्यानंतर उच्च न्यायालयाने याप्रकरणात गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले. तसेच, त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे म्हटले होते. त्यानुसार, एसीबीने शुक्रवारी या प्रकरणाचा अहवाल विशेष न्यायालयात सादर केला आहे. दरम्यान, हेमंत गवंडे यांना न्यायालयात खडसे यांच्या एमआयडीसीच्या मालकीची जमीन खरेदी प्रकरणात क्लोजर रिपोर्ट ‘क-समरी’ अहवाल सादर करण्यात आल्याचे पत्राद्वारे कळविण्यात आल्याचे सांगितले. परंतु, त्याबाबतच अहवाल अद्याप मला मिळाला नाही, असे गवंडे म्हणाले. 

ते म्हणाले, एमआयडीसी भोसरी यांच्या मागील 40 वर्षांपेक्षा अधिक काळ ताब्यात असलेल्या जमिनीवर एकूण 15 छोटे-मोठे उद्योगधंदे कार्यरत आहेत. तरीही मिळकतीची खरेदी का करण्यात आली. खडसे कुटुंबीय तेथे शेती करणार आहेत की, कोणता उद्योग उभारणार आहेत. खडसे यांचे खरेदीखत योग्य ठरल्याने मिळकतीचा ताबा कायदेशीररीत्या खडसे कुटुंबीयाकडे जातो. त्यामुळे याठिकाणी असलेल्या 15 उद्योगांचे पुढे काय करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.