होमपेज › Pune › ‘आवडेल तेथे प्रवास’ला मुदतवाढ

‘आवडेल तेथे प्रवास’ला मुदतवाढ

Published On: May 06 2018 1:54AM | Last Updated: May 06 2018 1:06AMपुणे : प्रतिनिधी 

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचार्‍यांकडून गतवर्षीच्या दिवाळीत ऐन सणाच्या काळात संप पुकारण्यात आला. या मुळे लाखो प्रवासी अक्षरशः वेठीस धरण्यात आले. दि. 17 ते 20 ऑक्टोबरदरम्यान कर्मचार्‍यांनी संप पुकारल्याने एसटी मार्गस्थ होऊ शकल्या नाहीत. परिणामी आवडेल तेथे प्रवास योजनेअंतर्गत पास घेऊन प्रवास करू इच्छिणार्‍या प्रवाशांना त्यांनी घेतलेल्या पासवर संप कालावधीत प्रवास करता आलेला नाही. अशा प्रवाशांना दि. 31 मेपर्यंतच्या कालावधीत मुदतवाढ देण्यास परवानगी देण्यात आली असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. 

यामुळे पास असूनदेखील संपकाळात चार दिवस प्रवास न करता आलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार असून 31 मेपर्यंत पासची मुदत असणार्‍यांना चार दिवस वाढवून मिळणार आहेत. दरम्यान, अशा प्रवाशांना एक वेळची खास बाब म्हणून आवडेल तेथे प्रवास योजना पासधारकास त्यांनी प्रवास न केलेल्या दिवसांच्या कालावधी इतका कालावधी 31 डिसेंबर 2017 पर्यंत वाढवून देण्यात यावा, अशा सूचना एसटी प्रशासनाने संबंधित आगारप्रमुखांना दिल्या होत्या. मात्र, याबाबत पुरेशी प्रसिद्धी देण्यात न आल्यामुळे प्रवासी याबाबत अनभिज्ञ होते. या मुळे त्यांना या सेवेचा लाभ घेता आला नाही. याबाबत मध्यवर्ती कार्यालयाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.