Thu, Aug 22, 2019 13:11होमपेज › Pune › ‘होमिओपॅथी’वरील विश्‍वास वाढावा

‘होमिओपॅथी’वरील विश्‍वास वाढावा

Published On: Apr 10 2018 1:14AM | Last Updated: Apr 10 2018 12:12AMपुणे ः प्रतिनिधी

‘होमिओपॅथी’ ही प्रभावी उपचारपद्धती असून, त्याद्वारे अनेक मोठ्या आजारांवर उपचार होतात. पण या पॅथीबाबत सर्वसामान्यांमध्ये जागृती नाही. एक स्वतंत्र शास्त्र म्हणून या उपचारपद्धतीचा प्रचार आणि प्रसार होणे ही काळाची गरज आहे. सध्याचे सरकार या पॅथीबाबत अनुकूल धोरणांचा अवलंब करीत असल्याने या पॅथीला चांगले भविष्य आहे. या पॅथीवर विश्‍वास ठेवायला हवा असे मत तज्ज्ञ व्यक्‍त करीत आहेत.

या पॅथीचा शोध डॉ. सॅम्युअल हानिमन या जर्मन वैद्याने सुमारे सव्वा दोनशे वर्षांपूर्वी लावला. त्यांचे स्मरण म्हणून दरवर्षी 10 एप्रिल हा त्यांचा जन्मदिन ‘जागतिक होमिओपॅथी दिन’ साजरा केला जातो. ते स्वतः ‘अ‍ॅलोपॅथी’मधील एम. डी. डॉक्टर होते. पण, या शास्त्राचा अभ्यास करताना त्यांना असे दिसून आले की, ज्या पदार्थाने मलेरियाचा रुग्ण बरा होतो तोच पदार्थ निरोगी व्यक्‍तीला दिल्यास त्यामध्ये मलेरियाची लक्षणे दिसून येतात. हा धागा पकडून पुढे त्यांनी उपचार केले आणि या शास्त्राचा उगम झाला.  

या पॅथीची उपचारांची ठराविक रूपरेषा ठरलेली नाही. या शास्त्राचा अधिकाधिक अभ्यास करून, त्यानुसार संबंधित डॉक्टर औषधोपचारांत निपुण होतात. या गोळ्यांचा प्रसार केंद्रीय मज्जातंतुद्वारे शरीरात होतो आणि त्याद्वारे उपचार होतात. या उपचार पध्दतीने प्रतिकारक  शक्‍ती वाढते आणि त्यामुळे आजार बरा होण्यास मदत होते. शस्त्रक्रिया करणे शक्य नसलेल्या वयोवृद्ध किंवा अर्थिक दुर्बल रुग्णांसाठीही पॅथी वरदान ठरत असल्याचा या शास्त्राचा दावा आहे.

रुग्णाची शारीरिक, मानसिक जडणघडण, आजारांचा इतिहास, इच्छा-आकांक्षा हे समजावून घेऊन मगच रुग्णाला औषधोपचार करण्यात येतो. औषधाने पेशी उद्दिपित होतात आणि रोगाचा प्रतिकार करून, त्याचा नाश करून सक्षम बनतात. म्हणून ही पॅथी रोगनिवारण करण्यात उपयुक्‍त आहे. ‘एमएनसी’ बिल ब्रिज कोर्ससह संमत व्हावे, याला आमचा पाठिंबा आहे; तसेच यासाठी महाराष्ट्र काउंसिल ऑफ होमिओपॅथी पाठपुरावा करत आहे.  - डॉ. बाळकृष्ण गायकवाड, माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र काउंसिल ऑफ होमिओपॅथी, मुंबई 

 

Tags : pune, pune news, World homeopathy day,