Tue, Jul 16, 2019 01:46होमपेज › Pune › जागतिक ब्रेन ट्युमर दिवस विशेष : वेळीच ओळखा ब्रेन ट्युमर

जागतिक ब्रेन ट्युमर दिवस विशेष : वेळीच ओळखा ब्रेन ट्युमर

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 08 2018 12:44AMपुणे ः

ब्रेन ट्युमर हा मेंदूच्या कॅन्सरशी संबंधित आजार आहे. यामध्ये मुलांचे प्रमाण जास्त आहे. त्याचे वेळीच निदान व उपचार केले तर तो बरा होऊ शकतो; तसेच आता यावर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक वैद्यकीय उपचार पध्दती उपलब्ध असून, ब्रेन ट्युमर झालेले रुग्ण उपचारानंतर सर्वसामान्य जीवन जगू शकतात, असे तज्ज्ञ सांगतात. 

सन 2000 पासून प्रत्येक वर्षी आठ जून हा ‘जागतिक ब्रेन ट्युमर दिवस’ म्हणून पाळला जातो. ब्रेन ट्युमरविषयी समाजात जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी या दिवसाचे महत्त्व आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगभरात दरदिवशी किमान 500 रुग्णांना ब्रेन ट्युमर झाल्याचे आढळून येत आहे. 

ब्रेन ट्युमर म्हणजे मेंदूमधील अनियंत्रित पेशींची होणारी वाढ. ही वाढ पटकन लक्षातही येत नाही. ब्रेन ट्युमरमध्ये दोन प्रकारच्या गाठींचा समावेश असतो. एक म्हणजे कॅन्सरविरहित आणि दुसरी कॅन्सरची. पहिला हा ‘बिनाइन ट्युमर’ असून, या प्रकारात मेंदूच्या नेहमीच्या पेशींना कुठेही धक्का न लावता ट्युमर वाढतो आणि ऑपरेशन करून हा ट्युमर काढून टाकला तर या विकारापासून मुक्ती मिळू शकते. दुसरा प्रकार हा ‘मेलिग्नंट ट्युमर’ हा आहे. हा ट्युमर मात्र कॅन्सरचा असतो. त्याचे ऑपरेशन केले, तरी कॅन्सरग्रस्त पेशींची पुन्हा वाढ होऊ शकते तसेच हा प्रकार घातक आहे.

सकाळच्या वेळी जास्त व जसजसा दिवस उजाडतो तसी कमी-कमी होत जाणारी डोकेदुखी, हा ब्रेन टयुमरचे महत्त्वाचे लक्षण आहे. या व्यतिरिक्त वारंवार शरीराचा तोल जाणे, डोके जड पडणे, स्मरणशक्तीचा लोप पावणे, डोक्यासोबत मान दुखणे, चालताना अडखळणे ही लक्षणे दिसून येतात. तसेच उलट्या, फिटस् येणे, दृष्टिदोष, तिरळेपणा, बोलण्यात अडखळणे,  मानसिक अस्वस्थता, शुद्ध हरपणे तसेच झोपाळू वृत्ती आदी लक्षणेही दिसून येतात. त्यामध्ये डोके दुखीवर ‘पेन किलर’ने तात्पुरता आराम मिळतो; पण औषधांची मात्रा कमी झाल्यानंतर पुन्हा तीव्रतेने डोके दुखायला लागते.

या आजाराची नेमकी काय कारणे आहेत, हे अद्याप स्पष्ट नाही. ब्रेन ट्युमरचे निदान हे डोक्याचा एक्स-रे, एमआरआय, पेट स्कॅन, मणक्यातील पाण्याचे परीक्षण याद्वारे होऊ शकते. निदान झाल्यावर शल्य चिकित्सा, रेडिओ थेरपी, केमोथेरपी तसेच औषधांच्या माध्यमातून ब्रेन ट्युमरवर उपचार केला जाऊ शकतो.