Wed, May 22, 2019 20:17होमपेज › Pune › जागतिक आनंदी दिवस : स्पर्धेच्या युगात आनंद हरवलाय

जागतिक आनंदी दिवस : स्पर्धेच्या युगात आनंद हरवलाय

Published On: Mar 20 2018 2:06AM | Last Updated: Mar 20 2018 12:47AMपिंपरी :  पूनम पाटील

सध्याच्या युगात प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली असून, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी युवकांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. त्यामुळे जीवनात ताणतणाव निर्माण होऊन आजचा युवक आनंदी राहण्याचेच विसरला आहे. विशेषतः पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना पाहता कुठेतरी नैराश्य आणि असुरक्षितता यामुळे हे प्रकार घडले असल्याचे वास्तव आहे. हे नैराश्य येऊ नये यासाठी संयुक्त राष्ट्रसंघातर्फे 20 मार्च हा दिवस जागतिक आनंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. शहरातील नेटवर्क फॉर युथ ही सामाजिक संस्था गेले कित्येक दिवस युवा पिढीला आनंदी राहण्यासाठी जीवनकौशल्याच्या आधारे मार्गदर्शन करत आहे. 

नेटवर्क फॉर युथ ही संस्था विविध क्षेत्रांतील युवातज्ज्ञांच्या वतीने निरपेक्ष भावनेने चालवण्यात येत असून, अनेक निराश तरुणांना संस्थेमार्फत जीवनाची खरी दिशा गवसली आहे. दैनंदिन जीवनातील ताणतणाव, स्वतःच्या स्वतःकडूनच असलेल्या अपेक्षा, नोकरीतील  असमाधान; तसेच आर्थिक विषय या सगळ्या समस्यांनी तरुणाई ग्रासली आहे. त्या अडचणींना सामोरे जाऊन स्वतःला सिद्ध करणे हे शहरातील युवावर्गाला कठीण जात आहे. त्यांना मार्ग दाखवण्याचे काम युथ फॉर नेटवर्क करत आहे.  

आनंदी राहण्यात भारताची घसरण

संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास उपाय संस्थेने 2016 मध्ये वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट जाहीर केला. त्यानुसार 158 देशांच्या जागतिक क्रमवारीत आनंदी राहण्यात भारताचा 118 क्रमांक होता. नंतर त्यात घसरण होऊन तो 120 च्या खाली गेला. प्रतिव्यक्ती राष्ट्रीय उत्पन्न, अपेक्षित आयुर्मान, सामाजिक आधार आणि आयुष्य जगण्याच्या स्वातंत्र्याला आनंदाचे मापदंड निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार हे क्रमांक काढण्यात आले. भारतात, खासकरून पिंपरी-चिंचवडसारख्या शहरात मनुष्य आनंदी जीवन जगायला विसरला आहे. त्यासाठी नेटवर्क फॉर युथ कार्यरत आहे. 

आज ‘दि रियल साईड ऑफ द रियल यू’वर परिसंवाद

प्रामुख्याने 12 ते 35 या वयोगटातील युवकांसाठी निर्णयक्षमता, स्वओळख, स्वतःच्या क्षमतांवर काम, देैनंदिन ताणतणावाचे  व्यवस्थापन, शैक्षणिक कौशल्य, पालकत्व याबाबत मार्गदर्शन व किशोर वयातील मुलांना जीवनकौशल्य प्रशिक्षण व नोकरी करणार्‍या युवकांसोबत जीवनपद्धती व्यवस्थापन आदींबाबत संस्था कार्य करत आहे. जागतिक आनंदी दिनानिमित्त  20 मार्चला  आंतरराष्ट्रीय आनंदी राहण्याचे दिवस, ‘दि रियल साईड ऑफ द रियल यू’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे.

नेटवर्क फॉर युथ हे बहुआयामी युवक विकासाच्या उद्देशाने टाकलेले एक पाऊल आहे. युवकांचे जीवनकौशल्य व आनंदासाठी संस्था काम करते.  हल्ली पौगंडावस्थेपासून ते प्रौढ व्यक्तींना ताणतणाव व दैनंदिन समस्यांना तोंड द्यावे लागते. बदलती सामाजिक परिस्थिती, छोटे कुटुंब, बेरोजगारी, वाढती स्पर्धा यामुळे नैराश्य बळावते आहे.विषम परिस्थितीत व्यक्तीमधील उमेद जागृत ठेवण्यासाठी नेटवर्क फॉर युथ युवक व पालकांना सकारात्मक दृष्टिकोन, वैज्ञानिक प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे. - डॉ. राम गुडगिला, जीवनकौशल्य प्रशिक्षक

 

Tags : Pimpri, Pimpri News, World Happy Day, Network for Youth, program,