Mon, May 27, 2019 00:51होमपेज › Pune › जागतिक रक्‍तदाता दिन विशेष : रक्‍तदान हे सर्वश्रेष्ठ दान

जागतिक रक्‍तदाता दिन विशेष : रक्‍तदान हे सर्वश्रेष्ठ दान

Published On: Jun 14 2018 1:35AM | Last Updated: Jun 14 2018 12:42AMपुणे : प्रतिनिधी

कुठलीही अपेक्षा न करता सामाजिक उत्तदरायित्व म्हणून आपल्या आसपास हजारो रक्‍तदाते रक्‍तदान करत आहेत. काही समाजसेवकांनी हजारो रक्‍तदात्यांना विविध संघटनांद्वारे एकत्र आणल्यामुळे समाजात रक्‍तदानाची चळवळ जोमाने सुरू आहे. 

14 जून हा ‘जागतिक रक्‍तदाता दिन’ रक्‍तदात्यांप्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्याचा दिवस आहे. त्यानिमित्त समाजातील काही रक्‍तदात्यांशी संवाद साधला असता त्यांनी त्यामागची प्रेरणा व अनुभव व्यक्‍त केले.

रक्‍तामुळे जोडले नाते

बँकेत काम करणारे राम बांगड, वय 62 यांचा रक्तदानाचा प्रवास थक्क करणारा आहे. 1976 साली झोपडपट्टीत राहणार्‍या एका मुलीच्या अंगावर भिंत कोसळली. त्यावेळी रक्तदान करून तिचे प्राण वाचविणार्‍या राम बांगड यांच्या रक्तदान चळवळीला तेथूनच सुरुवात झाली. नंतर त्यांनी ‘रक्ताचे नाते ट्रस्ट’ची स्थापना करून, त्याद्वारे 18 जिल्ह्यातील 40 हजार रक्‍तदात्यांना जोडले आहे. बांगड यांनी स्वतः 124 वेळा रक्तदान केले आहे.

लग्‍नातच केले रक्‍तदान

कोथरूड येथे आयटी कंपनीत काम करणारे पिंपरी चिंचवड येथील 26 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर सूरज टकले याने रक्‍तदानाबाबत जागृती आणण्यासाठी स्वतःच्या लग्‍नातच रक्‍तदान शिबिर आयोजित केले. शिबिरात स्वतः त्याने रक्‍तदान केले. त्याचा हा हुरूप पाहून पाहुणे, मित्र मंडळी अशा 68 जणांनीही रक्‍तदान केले. 

83 वेळा रक्‍तदान

संतोष गोपाळ, वय 43 हे वयाच्या अठराव्या वर्षापासून आणि प्रत्येक तीन महिन्याला रक्‍तदान करत आले आहेत. अनेक वेळा जवळचे नातेवाईक रुग्णाला रक्‍तदान करत नाहीत. त्यांच्यासमोर गोपाळ यांनी रक्‍तदान करून अनेकांना जीवनदान दिले आहे.

समाजमाध्यमाद्वारे रक्‍तदानाची चळवळ

नवी मुंबईचे राहुल साळवे यांचा अपघात झाल्यानंतर त्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी तब्बल 100 बाटल्या रक्‍त लागले. त्याची परतफेड म्हणून साळवे यांनी ‘हेल्पिंग हँड फॉर ब्लड’ हा ग्रुप तयार करून समाजमाध्यमाद्वारे अवाहन करत रक्‍तदानाला सुरवात केली. आता याद्वारे संपूर्ण राज्यात व इतर राज्यांतही 750 रक्‍तदाते त्यांना जोडलेले आहेत. 

रक्तदात्यांचे दान पेढ्यांच्या गल्ल्यात

पुणे : नवनाथ शिंदे

‘रक्तदान हेच जीवनदान’ अशी बिरुदे मिरवत रक्ताचे संकलन करणार्‍या काही रक्तपेढ्यांनी रक्तविक्रीचा धंदा जोमात सुरू केला आहे. दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने काही प्रातिनिधिक रक्तपेढ्यांची पाहणी केल्यानंतर वास्तव समोर आले आहे. रक्तपेढ्यांकडून एका पिशवीसाठी तब्बल 1500 ते 1800 रुपये आकारले जात आहेत. 

शासकीय रक्तपेढ्यांमध्ये रक्तपिशवीचा दर 850 रुपये आहे, तर खासगी रक्तपेढ्यांमध्ये पिशवी 1 हजार 450 रुपयांना विकणे बंधनकारक आहे. हे दर शासनाने ठरवून दिले आहेत. यापेक्षा अधिक दराने रक्तपिशवीची विक्री केल्यास त्या खासगी रक्तपेढीची मान्यता रद्द होऊ शकते. मात्र, शहरातील बहुतांश रक्तपेढ्यांकडून चढ्या दराने रक्तपिशव्यांची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

रक्तपेढ्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी राज्य रक्त संक्रमण समितीवर असते. पंरतु, रक्तपेढ्यांकडून चढ्या दराने रक्ताची पिशवी दिली जात असतानाही ही समिती काहीही कारवाई करीत नसल्याने दिसते.  

शहरात रक्तदाता शिबिर संयोजन समिती असावी, रक्तदात्याच्या नातेवाईकास मोफत रक्तपिशवी उपलब्ध व्हावी, याकडे शासनाने लक्ष द्यावे, असे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुहास निम्हण यांनी सांगितले.

अशी होते रक्तविक्री...

रुग्णांच्या नातेवाईकांकडून रक्तपिशवी घेण्यासाठी रक्तपेढ्यांत धाव घेतली जाते. तेथे 200 रुपये रक्त नोंदणी फी आकारली जाते. त्याची पावती दिली जात नाही. दरम्यान रक्ताची आवश्यकता असणार्‍या दिवशी उर्वरित 1 हजार 600 रुपये जमा केल्यानंतर रक्तपिशवी दिली जाते.