Sat, Aug 17, 2019 16:11होमपेज › Pune › सैन्यात काम करणे थरारक अनुभवांनी भरलेले : लेफ्टनंट जनरल निंभोरकर 

सैन्यात काम करणे थरारक अनुभवांनी भरलेले : लेफ्टनंट जनरल निंभोरकर 

Published On: Apr 30 2018 1:45AM | Last Updated: Apr 30 2018 12:33AMपुणे : प्रतिनिधी 

शत्रूशी लढताना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. दैव बलवत्तर असल्याने शत्रूला चारही मुंड्या चीत करून नेहमी परत यायचो. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीप्रमाणे देव माझ्या पाठीशी कायमच होता. देशाची सेवा करण्याचे माझे स्वप्न सैन्यात काम करताना पूर्ण झाल्याने समाधान वाटते. सैन्य दलात काम करणे थरारक अनुभवांनी भरलेले होते, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे सुपुत्र व सर्जिकल स्ट्राईकमधील नरवीर लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी रविवारी केले.

‘शूरा मी वंदिले’ या कार्यक्रमात लेफ्टनंट जनरल निंभोरकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. निंभोरकर युद्धभूमीवरील आपले अनुभव कथन करताना म्हणाले की, 1988 मध्ये द्रास सेक्टरमध्ये आमचे युनिट होते. शत्रूशी लढताना आम्हाला तेथे अनेक दिवस अन्न-पाण्याविना राहावे लागले. यामुळे शेवटी नाईलाजाने स्वतःची लघवी पीत तहान भागवावी लागली. माझ्या युनिटमध्ये सर्व जण सरदार असल्याने ते पगडी घालायचे. त्यामुळे ते कधीही हेल्मेट घालत नव्हते. यामुळे मी देखील हेल्मेट कधीच परिधान केले नव्हते. मात्र ज्या एकमेव वेळी मी हेल्मेट घातले, नेमक्या त्याच वेळी शत्रूची गोळी माझ्या हेल्मेटवर आदळली. 

2012-13 साली अनंतनागमध्ये असताना आम्ही अतिरेक्यांचा दररोज खात्मा करत होतो. हे आमच्या युनिटचे यश होते. जवानांमध्ये एकमेकांबद्दल जेवढी आपुलकी असते तेवढी इतरांत क्वचीतच दिसते, असेही ते म्हणाले. 

अहिर म्हणाले की, सर्जिकल स्ट्राईक खूप गाजले. लेफ्टनंट जनरल निंभोरकर यांचा त्यात प्रमुख सहभाग होता. सर्जिकल स्ट्राईकमुळे जगाने देशाची ताकद पाहिली. उरी येथील हल्ला बैचेन करणारा होता. यात अनेक जवान शहीद झाले. मात्र या हल्ल्यानंतर केवळ दहाच दिवसात भारताने पाकिस्तानला जसास तसे उत्तर देत, सर्जिकल स्ट्राईक केला. या गोष्टीने समाधान वाटले. निंभोरकर यांच्या सारख्या कर्तबगार अधिकार्‍यांमुळे देश सुरक्षित असून, नागरिक निर्धास्त आहेत, असेही ते म्हणाले.