Thu, Jul 18, 2019 16:33होमपेज › Pune › शिरोडकर कंपनीत कामगारांचा ‘एल्गार’

शिरोडकर कंपनीत कामगारांचा ‘एल्गार’

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 20 2018 12:28AMपिंपरी ः प्रदीप लोखंडे

कंपनीत युनियनची स्थापना केल्यामुळे भोसरी येथील शिरोडकर प्रेसीकॉम्प प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील सुमारे पाच कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे सुमारे 17 कामगारांनी कंपनीसमोर तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे.  या कामगारांच्या विरोधात कंपनीनेच पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. 

शिरोडकर प्रेसीकॉम्प प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटना (इंटक) स्थापन करण्यात आली. कंपनीतील अनेक कामगार संघटनेचे सभासद झाले. तेव्हापासून व्यवस्थापनाकडून कामगारांवर अन्याय सुरू झाला असल्याची तक्रार कामगार करत आहेत. यापूर्वी आठ कामगारांना खोटे आरोप करून काढून टाकण्यात आल्याने हा वाद न्यायालयात असल्याची माहितीही कामगारांनी दिली.

सध्या कंपनीतील सीएनसी व व्हीएमसी ऑपरेटर असणार्‍या पाच कामगारांना अचानक नोटीस देऊन कामावरून काढून टाकण्यात आले. दुसर्‍या दिवशी कामावर गेलेल्या संबंधित कामगारांना कंपनी गेटवरच अडवून ठेवले. युनियन सोडा; अन्यथा नोकरी, असा दबाव व्यवस्थापनाकडून येत असल्याचे कामगार सांगत आहेत. या कामगारांवर चुका केल्याचा ठपका ठेवत, त्याबाबत त्यांची चौकशी लावली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कामावरून काढून टाकण्यात आले असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. 

कंपनीच्या या भूमिकेविरोधात कामगारांनी ‘एल्गार’ पुकारत मंगळवार (दि. 16)पासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कंपनी व्यवस्थापनाकडून पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन वेळा चर्चा करूनही कोणताच ठोस उपाय निघाला नाही. काढून टाकलेल्यांपैकी अनेक कामगार कंपनीत परमनंट आहेत.