Wed, Mar 20, 2019 08:33होमपेज › Pune › बोपोडी, खडकीत मेट्रोचे काम सुरू

बोपोडी, खडकीत मेट्रोचे काम सुरू

Published On: May 14 2018 1:55AM | Last Updated: May 14 2018 12:50AMपिंपरी : प्रतिनिधी 

पुणे महापालिका, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, वाहतुक पोलिस आदी यंत्रणासोबत चर्चा करून सर्वसहमतीने बोपोडीहून पुढे खडकी, रेंजहिल्स या मार्गावर पुणे मेट्रोच्या मार्गिकेचे काम सुरू केले जाणार आहे. या भागांतील वाहतुक कोंडी लक्षात घेऊन महामेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने खबरदारी म्हणून हे पाऊल उचलले आहे. 

पिंपरी-चिंचवड शहराच्या तुलनेत बोपोडी व खडकीचा मार्ग अधिक अरूंद आहे.त्यामुळे या रस्त्यावर वाहतुक कोंडीची समस्या नित्याची झाली आहे. पुणे पालिकेच्या बोपोडी ते रेल्वे फाटकापर्यंतची सुमारे 900 मीटर अंतर हद्दीतून  मेट्रो मार्गिका जाणार आहे. बोपोडीत पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर पुणे पालिकेतर्फे रूंदीकरणाचे काम टप्प्या-टप्प्याने सुरू आहे. मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर वाहतुक कोंडीची दाट शक्यता आहे. या वाहतुक समस्येवर तोडगा काढण्यासाठी मेट्रोकडून विविध खबरदारी घेण्यात येत आहेत.  मोरवाडी ते दापोडीपर्यंत ग्रेडसेेपेरटरच्या दुभाजकावरून मेट्रोची मार्गिका आहे. दापोडीतील जुन्या व नव्या हॅरिस पुलाच्या मध्यातून मेट्रोचा पिलर उभारले जाणार आहेत. त्या पिलरची उंची 22 ते 25 मीटर इतकी सर्वांधिक असणार आहे. तेथून पुढे मेट्रोची मार्गिका बोपोडी सिग्नल चौकातून डाव्या बाजूने जाणार आहे. बोपोडी पोलिस चौकी, दर्गा, मिलिटरी डेअरी फार्म, जयहिंद चित्रपटगृह, सीएएफव्हीडी डेपो मैदान, सीएएफव्हीडी डेपो या मार्गाने मेट्रो मार्गिका जाणार आहे.

भविष्यात बोपोडी ते अंडी उबवणी केंद्रापर्यंतचा मार्ग 42 मीटर रूंद केला जाणार आहे. त्यावेळीस मेट्रोची मार्गिका ही रस्त्याच्या मध्य दुभाजकावर येणार आहे. बोपोडीत काही ठिकाणी सध्या रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. खडकी कॅन्टोन्मेंट व अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीच्या  ताब्यातील एकूण 1.900 किलोमीटर अंतरातून मेट्रो मार्गिका आहे. मेट्रोच्या कामासाठी या संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील जागा उपलब्ध होण्यापासून वर्षभरापासून पाठपुरावा सुरू आहे. संरक्षण विभागाकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्याकडून लेखी होकार मिळताच खडकी व रेंजहिल्समध्ये मेट्रोचे काम तातडीने सुरू केले जाणार आहे, असे मेट्रोच्या अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या 27 एप्रिलच्या सर्वसाधारण सभेत मेट्रोला जागा देण्याचा ठराव मंजुर करण्यात आला आहे.

खडकीतील ऑल सेन्ट हायस्कूल चौकातून खडकी पोलिस ठाणे येथून रेंजहिल्सकडे जाताना रेल्वे मार्गावर मेट्रोचा पुल उभारावा लागणार आहे. त्यास रेल्वेने तत्वत: मान्यता दिली आहे. त्याच्याकडून लेखी होकाराची प्रतिक्षा आहे. दरम्यान, लोहमार्गावरून जाणार्‍या  पुलासाठी गर्डर तयार करण्याचे काम मेट्रोने सुरू केले आहे.  हॅरिस पुलाच्या मुळा नदी पात्रात मेट्रोचे पिलर उभारणीचे काम सुरू आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाची परवानगी घेण्यात आली आहे. तेथील काम 31 मे रोजीपर्यंत करता येणार आहे. पावसाळ्यात तेथील काम बंद ठेवावे लागणार आहे. 

पुणे महापालिका, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, वाहतुक पोलिस आणि इतर आवश्यक घटकांची मेट्रोकडून चर्चा केली जाणार आहे. सर्व सहमतीनेचे बोपोडी व खडकीतील पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर मेट्रोचे काम सुरू केले जाईल. सध्या बोपोडीत मेट्रो स्टेशनच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे, असे मेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक गौतम बिर्‍हाडे यांनी सांगितले.