Sat, Jul 20, 2019 12:54होमपेज › Pune › शबरी आदिवासी घरकुल योजनेची कामे थंडच

शबरी आदिवासी घरकुल योजनेची कामे थंडच

Published On: Dec 31 2017 1:48AM | Last Updated: Dec 31 2017 12:27AM

बुकमार्क करा
पुणे : नवनाथ शिंदे

पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जमातींच्या संवर्गातील नागरिकांना हक्काचा निवारा उपलब्ध करण्यासाठी शासनाच्या वतीने शबरी आदिवासी घरकुल योजना सुरू केली आहे. मात्र, 2016-17 च्या आर्थिक वर्षातील 807 उद्दिष्टांपैकी फक्त 126 घरांची पूर्तता करण्यास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला यश मिळाले आहे. तर, उर्वरित 681 घरे अजूनही प्रशासकीय यंत्रणेेेेच्या कचाट्यातून बाहेर पडलेली नाहीत. त्यामुळे अनुसूचित जमातींच्या नागरिकांना घरांच्या प्रतीक्षेबद्दल अजून किती वेळ वाट पाहावी लागणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे 2016-17 मध्ये शबरी आदिवासी घरकुल योजनेंतर्गत ग्रामीण भागातील अनुसूचित जमातींच्या नागरिकांसाठी 807 घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार सर्व घरांसाठी ऑनलाइन मंजुरी देण्यात आली आहे. 

तर, 784 लाभार्थ्यांच्या बँक खात्याची पडताळणी करण्यात आली आहे. योजनेंतर्गत घरांच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यातील 780 लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे. तर, दुसर्‍या टप्प्यातील 395 लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. अनुदान वितरण करण्याची टक्केवारी 49 टक्के आहे. तर, तिसर्‍या आणि अंतिम टप्प्यातील 122 जणांना अनुदानाचे वर्गीकरण करण्यात आले आहे. 

तिसर्‍या टप्प्यातील अनुदानाची टक्केवारी फक्त 15 टक्के आहे. तर, उद्दिष्टापैकी 126 लाभार्थ्यांच्या घरांचे बांधकाम पूर्ण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान,  विविध कारणांमुळे तब्बल 681 घरांचे बांधकाम प्रशासकीय जोखडात अडकले आहे. शबरी आदिवासी  घरकुल बांधकामासाठी (शौचालयासहित) 1 लाख 32 हजारांचे अनुदान दिले जाते. मात्र, तिसर्‍या टप्प्यातील अनुदानास विविध कारणांमुळे उशीर होत असल्यामुळे आदिवासींना घरांमध्ये प्रवेशास विलंब लागत आहे. 

शबरी आदिवासी घरकुल योजनेंतर्गत 2016-17 मध्ये 13 तालुक्यांत 807 घरांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये आंबेगाव तालुक्यात 213, बारामती 5, भोर 8, हवेली 4, इंदापूर 13, जुन्नर 308, खेड 164, मावळ 84, वेल्हेमध्ये 8 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तर, दौंड, मुळशी, पुरंदर, शिरूर आणि भोर तालुक्यामध्ये एकाही नागरिकाला शबरी आदिवासी घरकुल योजनांचा फायदा देण्यात आला नाही.