Mon, Apr 22, 2019 05:41होमपेज › Pune › तब्बल २७२ अंगणवाड्यांचे काम रखडले

तब्बल २७२ अंगणवाड्यांचे काम रखडले

Published On: Dec 08 2017 1:41AM | Last Updated: Dec 08 2017 1:09AM

बुकमार्क करा

पुणे : नवनाथ शिंदे

राज्यातील प्राथमिकपूर्व शिक्षण देणार्‍या अंगणवाड्यांच्या बांधकामाला शासनाच्या निर्णयामुळे खोडा निर्माण झाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या वतीने (डीपीडीसी) अंगणवाड्या उभारणीसाठी देण्यात येणारा निधी थांबविण्याची सूचना सरकारने नुकतीच केली आहे; त्यामुळे जिल्ह्यात 2017-18 अंतर्गत उभारण्यात येणार्‍या 272 अंगणवाड्यांची कामे रखडली आहेत. इमारत बांधणीसाठी शासनाच्या महिला व बालविकास विभागाद्वारे राज्यस्तरावरून निधी उपलब्ध केला जाणार आहे. मात्र, हा निधी वेळेत मिळणार नसल्यामुळे सुरू होणार्‍या कामाला खो बसला आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये नव्याने उभारण्यात येणार्‍या 272 अंगणवाडी केंद्रांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती; तसेच अंगणवाडी बांधकामासाठी  समितीच्या वतीने 15 कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले होते.  अनुदानातून 2016-17 कालखंडातील 206 अंगणवाडी इमारत बांधकामासाठी 4 कोटी 14 लाखांचा निधी स्पीलवर्क म्हणून उपलब्ध करून देण्यात आला.उरलेल्या 10 कोटी 86 लाख अनुदानाचे दीडपट नियोजन करून 16 कोटी 29 लाख रुपयांच्या अनुदानातून 272 अंगणवाडी केंद्रांच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार होते. दरम्यान 272 पैकी 213 अंगणवाडी इमारतींच्या बांधकामाला प्रत्येकी 6 लाख रुपयांची मान्या देण्यात आली होती. तसेच उर्वरित 59 अंगणवाड्या प्राथमिक शाळा इमारती किंवा वर्गखोल्यात भरण्यास योग्य किंवा अयोग्य आहेत, याची माहिती प्राप्‍त झाल्यानंतर मान्यता देण्यात येणार होती. 

जिल्हा नियोजन समितीने 5 जून 2017  रोजी अंगणवाडी इमारत उभारणीला मान्यता दिल्यानंतर अवघ्या काही दिवसांत कामकाज सुरू करण्यात येणार होते. दरम्यान, शासनाने परिपत्रक काढून जिल्हा नियोजन समितीकडून देण्यात येणारे अनुदान थांबविण्याची सूचन केली आहे; त्यामुळे अंगणवाड्या उभारणीत वेळ वाया जाणार आहे.

अंगणवाडी इमारत बांधकामास शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने निधी उपलब्ध करण्यात येणार आहे; त्यामुळे जिल्हा नियोजन समितीने 2017-18 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी जिल्हा परिषदेला वितरित करू नये, अशा सूचना जिल्ह्याधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार 272 अंगणवाड्या उभारणीच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात 23, बारामतीत 37, भोर 6, दौंड 12, हवेली 25, इंदापूर 22, जुन्नर 11, खेड 47, मावळ 5, पुरंदर 5, शिरूरमधील 20 इमारत बांधणीला शासन निर्णयाचा फटका बसला आहे.