Mon, Apr 22, 2019 04:18होमपेज › Pune › दिवसा नर्सरीत काम, रात्री घरफोड्या...

दिवसा नर्सरीत काम, रात्री घरफोड्या...

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 24 2018 12:29AMपुणे : प्रतिनिधी

दिवसा नर्सरीत काम करायचे आणि मध्यरात्री शहरातील उच्चभ्रू भागात कारने येऊन, बंद फ्लॅट फोडून लाखोंचा माल पळविणार्‍या चौघांना अलंकार पोलिसांनी अटक केली आहे. या चौघांकडून 25 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे, तर त्यांच्यासोबत चोरीचे दागिने घेणार्‍या एका सराफी कागिराला पकडण्यात आले आहे. त्यांनी अलंकार आणि कोथरूड भागात घरफोड्या केल्या आहेत. 

जगशी मंगा बुटीया (वय 50, रा. शेडगे वस्ती, कान्हेगाव, ता. मावळ), राकेश उर्फ राजेश पोपट वाघमारे (वय 32, रा. मायानगरजवळ, वडगाव मावळ), भरत विजयी बुटीया (वय 35, रा. गांधीनगर, देहूरोड), जयंती केशव बुटिया (वय 32, रा. भोते वस्ती, सोमाटणे, ता. वडगाव मावळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रविवार पेठेतील सराफी कारागीर शंकर सुफलचंद बारुई (वय 39, रा. रविवार पेठ, मूळ कोलकाता) यालाही अटक करण्यात आली आहे. 

शहरात सध्या घरफोड्या करणार्‍या टोळ्यांनी चांगलाच धुडगूस घातला आहे. त्यातही गेल्या काही महिन्यापांसून शहरात कारमध्ये येऊन घरफोड्या करणार्‍या टोळ्या सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नाकाबंदीसोबतच पेट्रोलिंग आणि गस्तीवर भर देण्यात आला आहे. दरम्यान मार्शल तसेच पेट्रोलिंगवेळी कारची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः कारमध्ये तीन ते चार लोक असल्यास त्यांना थांबवून विचारपूस केली जात आहे. 

अशाच पद्धतीने पेट्रोलिंग करीत असताना अलंकार पोलिसांनी डहाणूकर कॉलनीत मध्यरात्री जगशी, राके श व भरत हे कारमधून जात असताना त्यांना कार थांबविण्याचा इशारा केला. मात्र, ते तसेच निघाल्याने त्यांचा पाठलाग करून अडविले. गाडीची तपासणी केल्यानंतर त्यात कटावणी, पकडी व करवती असे घरफोडीसाठी लागणारे साहित्य मिळाले. त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी साथीदार जयंती याच्यासोबत चोर्‍या केल्याची कबुली दिली. 

त्यांच्याकडून एकूण चौदा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत पोलिसांनी 25 लाख 45 हजार रुपयांचा माल जप्प्त केला आहे. त्यांनी चोरीतील माल विकलेला सराफी कारागीर शंकर बारुई यालाही अटक केली. ही कारवाई परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली अलंकार पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक रेखा साळुंखे,  सहायक निरीक्षक संदीप बुवा व कर्मचारी श्रीकांत चव्हाण, राजेेंद्र लांडगे तसेच किरण नेवसे यांच्या पथकाने केली.

दिवसभर नर्सरीत काम...

जगशी बुटिया व त्याचा चुलत भाऊ भरत तसेच जयंती बुटिया मूळचे गुजरातमधील आहेत. परंतु ते लहानपणापासून पुण्यात आहेत. तर राकेश वाघमारे वडगाव मावळचा असून, त्याला 2014 साली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले होते. दरम्यान चौघेही सोमाटणे फाटा परिसरात असणार्‍या नर्सरीत काम करतात. तर काही जणांनी नर्सरी चालविण्यास घेतल्या आहेत. हा प्रकार नर्सरीचे मालक तसेच तेथील इतर कामगारांना समजल्यानंतर त्यांनाही धक्क्का बसला. दरम्यान आरोपींनी सर्व घरफोड्या उच्चभ्रू समजल्या जाणार्‍या अलंकार व कोथरूड परिसरात केलेल्या आहेत.

असे आले गुन्हे उघडकीस...

निर्ढावलेले गुन्हेगार सहसा पोलिसांना लवकर गुन्ह्याची कबूली किंवा त्याबाबत माहिती देत नाहीत. त्यात घरफोड्यांसारख्या गुन्ह्यांची उकल करणे म्हणजे कठीणच काम. परंतु अलंकार पोलिसांनी आरोपींना पकडल्यानंतर चौघांकडे वेगवेगळी माहिती घेतली. प्रत्येकाला कुठे घरफोडी केली हे दाखविण्यासाठी घटनास्थळ दाखविण्यास सांगितले. त्यावेळी चौघांनी वेगवेगळी चौदा ठिकाणे दाखविली, असे उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी सांगितले. दरम्यान गेल्या वर्षात अलंकार पोलिस ठाण्याअंतर्गत एकूण 18 घरफोड्यांचे गुन्हे दाखल झाले असून, त्यातील 9 गुन्हे उघडकीस आण्यात आले आहेत.