Mon, Jul 22, 2019 02:38होमपेज › Pune › लाकडाचा कंगवा, वस्तरा अन् टुथब्रशही

लाकडाचा कंगवा, वस्तरा अन् टुथब्रशही

Published On: Jul 02 2018 1:47AM | Last Updated: Jul 02 2018 1:13AM पुणे : अपर्णा बडे

प्लास्टिकबंदीनंतर कारवाईचा धडाका सुरू झाल्याने या पार्श्‍वभूमीवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पर्यावरणपूरक वस्तूंनी बाजारपेठ व्यापली आहे. द्रोण, पत्रावळ्या या नेहमीच्या वापराच्या वस्तूंबरोबरच लाकडाचा कंगवा, टुथब्रश आणि वस्तरा विक्रीसाठी दाखल झाल्याने या मार्केट फंड्याची जोरदार चर्चा आहे.

प्लास्टिकबंदीमुळे बाजारातील प्लास्टिक-थर्माकोलपासून बनवलेल्या डिश, ग्लास व वाट्या यांची जागा बांबू, उसाची चिपाडे आणि सुपारीच्या पानांपासून तयार झालेल्या पर्यावरणपूरक डिश, वाट्या, चमचे यांनी घेतली आहे. प्लास्टिकबंदीच्या पार्श्‍वभूमीवर याला मोठी मागणी आहे. प्लास्टिकबंदीचे काटेकोरपालन करण्यासाठी प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी  पर्यावरणाचा र्‍हास करणार्‍या प्लास्टिक व थर्माकोलच्या डिशची विक्री बंद झाली असून पर्यावरणपूरक अशा अतिशय मजबूत व आकर्षक डिश-वाट्या, चमच्यांची जोरदार विक्री सध्या सुरू आहे. वाढदिवस, लग्नसमारंभ अशा विविध कार्यक्रमांसाठी ग्राहकांकडून सध्या सुपारीची पाने व उसाच्या चिपाडापासून तयार झालेल्या डिश, बॉउल, बांबूचे स्ट्रॉ, चमचे यांची मागणी होत असल्याची माहिती आनंदी इको कॉन्झर्व दुकानाच्या होलसेल विक्रेत्या मृणाल बिदनुरकर यांनी दिली.

उसाच्या चिपाडापासून तयार झालेल्या डिश, जेवणासाठी ताट, वाट्या सुपारीच्या पानांपासून बनलेल्या डिश-वाट्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत. हे साहित्य टिकाऊ आहे. त्यामुळे भोजनावळींसाठी थर्माकोलऐवजी सुपारीच्या पानांच्या पत्रावळ्यांची मागणी वाढली आहे. या डिश धुऊन पुन्हा वापरता येतात, असे मृणाल यांनी सांगितले. सुपारीच्या पानापासून तयार झालेल्या डिशचे उत्पादन कोकणाबरोबरच कर्नाटक, दिल्ली, उत्तर प्रदेश येथे होते. पर्यावरणपुरक साहित्य प्लास्टिकच्या साहित्यापेक्षा केवळ एक दोन रुपयांनी महाग आहे, तसेच त्याचा पुनर्वापरही शक्य आहे. या डिशला छोटे कप्पेही आहेत. या पर्यावरणस्नेही डिश व वाट्यांचे विघटन होते. तसेच गाई-म्हशींचे खाद्य म्हणूनही याचा वापर होऊ शकतो.

लाकडाच्या वस्तू 2 रुपयांपासून

पर्यावरणपूरक वस्तूंच्या किमती अवाक्यात असून डिश आकारानुसार 2 ते 8 रुपयांत, बाउल्स 2 ते 3 रुपयांत, चमचे, स्ट्रॉ अडीच रुपये, तर ब्रश, कंगवा, वस्तर्‍याची किंमत 100 ते 120 रुपये इतकी असल्याचे मृणाल यांनी सांगितले.