Sat, Mar 23, 2019 18:33होमपेज › Pune › शहरातील महिला, मुली असुरक्षित !

शहरातील महिला, मुली असुरक्षित !

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 12:06AMपिंपरी : अमोल येलमार  

जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये आठ वर्षीय चिमुकल्या असिफावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली. या दुदैवी घटनेनंतर देशात महिला आणि मुली असुरक्षित असल्याचे स्पष्ट होत आहे. देशाप्रमाणे राज्यात, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातही महिला, मुलींवर दररोज अत्याचार होत आहेत. परिमंडळ तीनच्या हद्दीत तीन महिन्यांत महिला अत्याचाराचे 87 गुन्हे दाखल आहेत. तर असिफाप्रमाणेच काही वर्षांपूर्वी निगडी आणि भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन बालिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र या दोन्ही गंभीर गुन्ह्यातील नराधम, मारेकरी अद्याप मोकाट फिरत आहेत. या दोन बालिकांच्या नातेवाईकांना पोलिस कधी न्याय देणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

एकीकडे ‘बेटी बचाव आणि बेटी पढाव’साठी देशभरात प्रयत्न सुरु आहेत. महिलांना सन्मान मिळावा यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असताना अशा प्रकारच्या घटना विचार करायला भाग पाडतात.  नराधमाने ‘त्या’ मुलीचे लचके तोडले. तेवढ्यावरच न थांबता त्याने तिची हत्या केली. यावर देशभरातून आरोपींना कठोर शिक्षेची मागणी होत आहे.  अनेक राजकीय, फिल्म स्टार, उद्योजक याकडे गांर्भियाने पाहताना दिसत आहेत. तर सोशल मिडीयावरही अशा प्रकारांची चर्चा होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीनेही अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे वक्तव्य केले. 

चार-पाच वर्षांपुर्वी पिंपरी-चिंचवड शहरात दोन घटना घडलेल्या होत्या. भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कासारवाडी येथे डिसेंबर 2012 मध्ये चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आले. अपहरणानंतर  तिच्यावर नराधमांनी लैगिंक अत्याचार केले आणि तिचा गळा आवळून खून केला. तरीही गुन्हा उघडकीस आला नाही. निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मे 2013 मध्ये अशीच घटना घडली. ओटास्किम परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या तीन वर्षाच्या बालिकेला एका नराधमाने उचलून नेले. तिच्यावर लैगिंक अत्याचार केले. त्यानंतर तिचा खून केला. याही गंभीर गुन्ह्याला चार वर्षे पुर्ण झाली तरीही आरोपी मोकाटच आहेत.

या घटनांसोबत शहरात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठे आहे. अल्पवयीन मुलींना अमिष दाखवून त्यांच्यासोबत लैगिंक अत्याचार, तरुणींना लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार यासारखे गुन्हे घडत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात जानेवारी ते मार्च 2018 या अवघ्या तीन महिन्यात विनयभंग आणि बलात्काराचे तब्बल 87 गुन्हे पोलिस दफ्तरी नोंद झाले आहेत. अनेक प्रकार समाजातील इज्जतेपोटी दाखल होत नाहीत. शहरात मोठ्या प्रमाणांवर महिला अत्याचाराचे प्रकार होत आहेत. यामध्ये 27 बलात्कार आणि 87 विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत.
सामाजिक संघटनेच्या संवेदना बोथट जम्मू काश्मिरच्या घटनेनंतर देशभर आंदोलने, कॅण्डल मार्च, पोलिसांना निवेदने दिले जात आहेत. मात्र पिंपरी-चिंचवड शहरातील अशा घटनांचा निषेध करायला किंवा त्याचा पाठपुरावा करायला सामाजिक संघटनाच्या पदाधिकार्‍यांच्या संवेदना बोथट झाल्याचे दिसत आहे. कासारवाडी आणि निगडी घटनेनंतर कोणत्याच संघटनेने निषेध व्यक्त केला नाही किंवा पोलिसांकडे आरोपीला अटक करण्यासाठी पाठपुरवा केला नाही.

Tags : Pimpri, Women, city, girls, unsafe