Mon, Aug 19, 2019 01:21होमपेज › Pune › पुणे : महिलेचा मृतदेह अखेर नातेवाईकांनी घेतला ताब्यात 

पुणे : महिलेचा मृतदेह अखेर नातेवाईकांनी घेतला ताब्यात 

Published On: Jan 24 2018 4:36PM | Last Updated: Jan 24 2018 4:36PMपिंपरी :प्रतिनिधी

अतिक्रमण विभागाचे पथक कारवाई करून आपले घर पडेल या भीतीने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह तब्बल 24 तासांनंतर ताब्यात घेण्यात आला. संबंधित प्रकाराची योग्य चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर जमावाने मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, मंगळवार सायंकाळपासूनच औंध रुग्णालयात तणावाचे वातावरण होते. जमावाचा रोष लक्षात घेता कोणाताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. हा प्रकार मंगळवारी दुपारी पिंपळे गुरव येथे घडला होता.

देवीबाई राम पवार (32, रा. पिंपळे गुरव) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मंगळवारी अतिक्रमण विभागाचे पथक पिंपळे गुरव, देवकर पार्क येथील अनधिकृत घरांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. त्या वेळी पवार यांच्या घराची पाहणी करत असल्याचे देवीबाई यांना समजले. आपल्या घरावरही कारवाई होणार ही भीती त्यांच्या मनात आली. डोक्यावरचे छप्पर पाडणार या नैराश्यातून त्यांनी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पिंपळे गुरव, रुग्णालय परिसरात नागरिक, नातेवाईक, मोठी गर्दी केली. तणावाचे वातावरण निर्माण झाले. पिंपळे गुरव, थेरगाव येथील रुग्णालय, महापालिका या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नातेवाइकांनी; तसेच विश्‍वगोरा बंजारा सेवा संघाने विरोध केला. या आत्महत्येस पालिकेचे पदाधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी, त्यानंतरच मृतदेह हलविण्याचा पवित्रा घेतला.मृतदेह कुजण्याची शक्यता डॉक्टर आणि पोलिसांनी वर्तवली, त्यामुळे नातेवाइकांच्या संमतीने मृतदेह शवविच्छेदनास औंध जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.

शवविच्छेदन करतानाही नातेवाईक आणि जमावाने अनेकदा विरोध केला; मात्र त्यांची समजूत काढत शवविच्छेदन केले.  त्यानंतरही नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. औंध जिल्हा रुग्णालयात बंजारा समाजाचे 600 ते 800 लोक जमा झाले होते. पालिकेच्या अधिकार्‍यांवर  कायदेशीर कारवाई करावी, त्यानंतरच मृतदेह ताब्यात घेण्याचा पवित्रा जमावाने घेतला. त्यामुळे बुधवारी सकाळपासून पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले. यातच रुग्णालयात राजकीय पदाधिकार्‍यांनी हजेरी लावत दोषींवर कारवाईची मागणी केली. अखेर या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास संमती दर्शवली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीत देवीबाई पवार यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

पोलिसांवर मोठा ताण...

देवीबाई पवार यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार दिला; तसेच औंध जिल्हा रुग्णालयात नातेवाईक, समाजबांधव यांची गर्दी वाढू लागली यामुळे तणावाचे वातावरण निर्माण होऊ लागले. पोलिसांनी मंगळवारी रात्री सर्व पोलिस ठाण्यांचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी, राज्य राखीव दलाची तुकडी; तसेच इतर पोलिस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात केला.