Mon, Aug 19, 2019 01:12होमपेज › Pune › ‘महिला आयोग तुमच्या दारी’ने महिलांना दिलासा

‘महिला आयोग तुमच्या दारी’ने महिलांना दिलासा

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 12 2018 1:09AMपुणे : प्रतिनिधी 

कौटुंबिक कलह व हिंसाचार, नातेवाईकांमधील वाद, प्रॉपर्टीचे वाद  अशा अनेक प्रकारच्या समस्यांनी पीडित महिलांनी पुण्यात आलेल्या महिला आयोगासमोर मोठ्या संख्येने हजेरी लावून समस्या मांडल्या.  विभक्त होण्याच्या मार्गावर असलेल्या दोन जोडप्यांचे  आयोगाने  समुपदेशन करून पुन्हा एकत्र राहण्यासाठी त्यांचे मन वळवण्यात यश मिळवले.   ‘महिला आयोग तुमच्या दारी’ या उपक्रमातून तत्काळ सुटलेले कौटुंबिक प्रश्‍न पाहता समस्याग्रस्त महिलांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. 

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि न्याय मिळावा यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येतो. बुधवारी पुणे शहरातील समाजकल्याण विभागाच्या इमारतीत महात्मा गांधी प्रशिक्षण केंद्रात या आयोगाने महिलांच्या तक्रारी निवारणाचे काम केले. यावेळी रहाटकर यांनी तडजोड झालेल्या अणि दाखल झालेल्या केसेसची माहिती दिली. यावेळी  पोलिस प्रशासन, विधी सल्लागार,  समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित होते. 

ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यावेळी सुमारे वीस केसेस दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. महिला आयोग आपल्या दारीअंतर्गत सुनावणीत नव्या तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे  कैफियत मांडणार्‍या महिलांना त्वरित दिलासा मिळत असल्याचे  रहाटकर यांनी सांगितले.  27 जुलैला दिल्ली येथे महिला व बालविकास व महिला आयोगाच्या वतीने ‘एनआरआय मॅरेज आणि ट्रॅफिकिंग’ या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली असून त्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

वर्षभरात  सुमारे दीड हजार तक्रारींचा पाऊस

महिला आयोगाकडे वर्षभरात अंदाजे बाराशे ते तेराशे लेखी तक्रारी दाखल होतात. याशिवाय तोंडी समस्या मांडून सल्ला मागायला येणार्‍या महिलांचाही आकडा मोठा आहे.  ‘तीन वेळा तलाक’च्या केसेस दाखल होण्याचे प्रमाणही मोठे आहे. ग्रामीण भागात जास्त प्रमाणात कौटुंबिक कलहाच्या समस्या आहेत; मात्र शहरी भागात पती-पत्नीची वैयक्तिक भांडणे, लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणार्‍या जोडप्यांचे प्रश्‍न, ह्युमन ट्रॅफिकिंग, सायबर गुन्हे, एनआरआय मुलांशी लग्न केलेल्या मुलींच्या समस्या असे नाना प्रश्‍न  घेऊन महिला येत असतात. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा असाच प्रयत्न असतो, असे रहाटकर यांनी सांगितले.