Fri, Apr 26, 2019 04:04होमपेज › Pune › महिलेला आत्महत्येस प्रवृत्त; वरिष्ठाला पाच वर्षे सक्‍तमजुरी

महिलेला आत्महत्येस प्रवृत्त; वरिष्ठाला पाच वर्षे सक्‍तमजुरी

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 16 2018 1:02AMपुणे : प्रतिनिधी 

कंपनीत के्रडिट मॅनेजरपदावर काम करणार्‍या अश्‍विनी महेंद्र पाटील (रा. प्रियदर्शनी विहार, वारजे) या महिलेला मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या वरिष्ठाला अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश संजश्री घरत यांनी पाच वर्षे सक्‍तमुरीची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणात न्यायालयाने आरोपीला 14 हजारांचा दंडदेखील ठोठावला आहे. 

सूरज सुंदरलाल बुंदेले (36, रा. गुरुवार पेठ, काची आळी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.  महेंद्र अशोक पाटील (35, रा. प्रियदर्शनी विहार, वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. 8 सप्टेंबर 2016 रोजी पाटील यांच्या राहत्या घरी हा प्रकार घडला. 

मृत अश्‍विनी पाटील आणि फिर्यादी महेंद्र पाटील हे पती-पत्नी असून, बुंदेले हा अश्‍विनी यांच्या कंपनीतील वरिष्ठ आहे. अश्‍विनी डीएचएफएल कंपनीत के्रडिट मॅनेजर म्हणून काम पाहत असताना, आरोपी हा याच कार्यालयात अश्‍विनीचा वरिष्ठ म्हणून नोकरीस होता. घटनेच्या दिवशी महेंद्र पाटील हे त्यांचे काम उरकून रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरी आले. त्यांनी घराची बेल वाजवली; मात्र दरवाजा उघडला जात नसल्याने त्यांनी पत्नीच्या मोबाईलवर संपर्क केला. परंतु मोबाईलही उचलत नसल्याने त्यांनी शेजार्‍यांच्या मदतीने दरवाजा तोडला. दरवाजा तोडल्यानंतर त्यांना पत्नीचा पंख्याला लटकेला मृतदेह दिसला. शेजारच्यांनी पोलिसांना फोन केला.

तिच्या एका मोबाईल फोनची रिंग वाजत होती. तो फोन सूरज नावाच्या व्यक्‍तीचा होता. त्या फोनला उत्तर देताना महेंद्र यांनी अश्‍विनी गेली असल्याचे सांगत फोन ठेवून दिला.पत्नीचे दोन्ही मोबाईल तपासल्यानंतर त्यामध्ये आरोपी सूरज बुंदेले हा तिला त्रास देत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच घटनेच्या दिवशी तो सोसायटीच्या पार्किंगमध्ये येऊन तिला मेसेज करून दार उघडण्यासाठी सांगत असल्याची बाबही तपासात उघड झाली. पत्नीने घटनेच्या आदल्या दिवशी काम सोडण्याबाबतही पतीला सांगितल्याचे तपासात समोर आले. खटल्यात सहायक जिल्हा सरकारी वकील गिरिजा देशपांडे यांनी तेरा साक्षीदार तपासले.

यामध्ये मोबाईलवरील मेसेज, मोबाईल लोकेशनचे अहवाल, फिर्यादीची, तपास अधिकार्‍यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्‍तिवाद ग्राह्य धरून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच वर्षे सक्‍तमजुरी, 10 हजार दंड, मानसिक त्रास देऊन शांतता भंग केल्याप्रकरणी 1 वर्ष सक्‍तमजुरी, दोन हजार दंड, तर छेडछाड केल्याप्रकरणी 1 वर्ष सक्‍तमजुरी आणि दोन हजारांचा दंड न्यायालयाने सुनावला आहे.  सहायक फौजदार लवांडे, पोलिस हवालदार इनामदार, बागुल आणि साळवे यांनी खटल्यात महत्त्वाची कामगिरी बजावली.