Tue, Aug 20, 2019 04:51होमपेज › Pune › लांडगे, गायकवाड यांची मैत्री जोरात

लांडगे, गायकवाड यांची मैत्री जोरात

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 22 2018 10:46PMपिंपरी : संजय शिंदे

भारतीय जनता पार्टी सत्तेत असणार्‍या पिंपरी-चिंचवड महापालिकेची मनसबदारी चिंचवड आणि भोसरी विधानसभेकडे विभागून देण्यात आली आहे. महापौर भोसरीकडे तर महापालिकेच्या आर्थिक नाड्या चिंचवडकडे स्थित झाल्या आहेत. वरून एक दिसत असलेले तरी एकमेकाला ‘आडवा आणि जिरवा’मध्ये दोन्ही मतदारसंघातून जोरदार टशन सुरू आह.  भोसरीचा चाणक्य म्हणून ओळख असणार्‍या कार्तिक लांडगे आणि स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड यांचे पती विनायक गायकवाड यांची मैत्री जोरावर असल्याची चर्चा भाजप  वर्तुळात आहे. 

विकासकामांच्याबात पालिकेत शह-काटशहाच्या राजकारणाला जोर आला असतानाच शहराध्यक्षांचा खंदा समर्थक असणार्‍या गायकवाडांची भोसरीच्या चाणक्याबरोबर दिवसेंदिवस घट्ट होत असलेला ‘याराना’ सर्वांनाच अचंबित करणार असल्याची भाजपा गोटात चर्चा सुरू आहे. 

पहिले सव्वा वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर पालिकेच्या पदाधिकार्‍यांमध्ये बदल करण्यात आला. स्थायी समिती अध्यक्षपदी दुसर्‍यांदा आपल्या समर्थकाला संधी देण्यात शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यशस्वी झाले. खंदे समर्थक विनायक गायकवाड यांच्या पत्नी नगरसेविका ममता गायकवाड यांना संधी दिली. 

स्थायीत अध्यक्षपदाच्या निवडीत पिछाडीवर पडलेल्या आ. लांडगे समर्थकांनी राहुल जाधव यांना महापौर करण्यासाठी जोर लावला. तर आ. जगताप गटाने ही आपलाच प्रथम नागरिक होण्यासाठी जोरदार ‘लॉबिंग’ केले होते; मात्र कुस्ती खेळात पारंगत असणार्‍या आ. लांडगे यांनी राहुल जाधव यांना महापौरपदी संधी देत पक्षांतर्गत विरोधकांना धोबीपछाड मारत ‘हम भी किसी से कम नही’ हे दाखवून दिले. 

दरम्यान, पालिकेत भाजपाची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर आ. लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघात विविध विकासात्मक कामांना मंजुरी मिळविली होती; मात्र पक्षातीलच अंतर्गत गटा-तटांच्या  राजकारणामुळे आ. लांडगे समर्थकांनी सुचविलेल्या विकासकामांना खो घालण्यात पक्षांतर्गतच विरोधक यशस्वी झाले. 

तरी ही यात हार न मानता लांडगे समर्थकांनी नेटाने काम सुरू ठेवले आहे. आ. जगताप गटाच्या तत्कालीन स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी ही विकासकामे करण्याच्या दृष्टीने भोसरीबरोबर जुळवून घेतले होते. त्याचाच कित्ता विद्यमान स्थायीच्या अध्यक्षा ममता गायकवाड यांचे पती विनायक गायकवाड हे गिरवत असल्याने भोसरीचे चाणक्य कार्तिक लांडगे यांच्यामधील मैत्री घट्ट होत असल्याची जोरदार चर्चा भाजपाच्याच गोटात आहे.

पक्षवाढीसाठी गटा-तटातील दुरावा कमी करण्याच्या दृष्टीने या दोघांकडून प्रयत्न सुरू असल्याची ही चर्चा दोघांचे समर्थक व्यक्त करत आहेत; परंतु पालिकेत कुरघोडीचे राजकारण सुरू असताना लांडगे आणि गायकवाड मैत्रीमुळे पक्षांतर्गतच चर्चेला उत आला आहे.