Thu, Jul 18, 2019 08:09होमपेज › Pune › योग्य प्रशिक्षणाविनाच दिली चालकांच्या हाती ‘शिवशाही’

योग्य प्रशिक्षणाविनाच दिली चालकांच्या हाती ‘शिवशाही’

Published On: Jan 13 2018 1:14AM | Last Updated: Jan 12 2018 10:45PM

बुकमार्क करा
पिंपरी : नरेंद्र साठे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या शिवशाही बससंदर्भात चालकांमध्ये नाराजी आहे. वल्लभनगर आगारातील ज्या चालकांकडे शिवशाही चालवण्याची जबाबदारी दिली, त्यांना या बस चालवण्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन आठवड्यांत मार्गावर असतानाच तीन शिवशाही नादुरुस्त झाल्या. यासंदर्भात चालकांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले की, आम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण न देता, थेट गाडी चालवण्यास सांगितले. शिवशाहीला असलेल्या वेगवेगळ्या बटणांमुळे सर्वच चालकांत गोंधळाची अवस्था झाल्याचे ते म्हणाले.

डिसेंबर महिन्यात 24 तारखेला वल्लभनगर आगाराला 8 शिवशाही बस देण्यात आल्या. तुळजापूर, उमरगा, नाशिक, दापोली, चिपळूण या पाच मार्गांवर या शिवशाही बस धावत आहेत. या मार्गावरील तीन बस मार्गावर असताना नादुरुस्त झाल्या होत्या, तर एका बसचा दरवाजा ऑपरेट होत नसल्याने त्याची देखील दुरुस्ती करावी लागली. अशा विविध  कारणांमुळे वल्लभनगर आगारात आलेल्या शिवशाही बसवर चालक नाराज आहेत. चालकांचे म्हणणे असे आहे की, किमान आमच्या हाती शिवशाही देण्याच्या अगोदर प्रशिक्षण देणे आवश्यक होते. पहिल्याच आठवड्यात तीन बस नादुरुस्त झाल्या होत्या. त्या दुरुस्त करून पुन्हा मार्गस्थ करण्यात आल्या आहेत; 

परंतु आम्हा चालकांना त्याची पुरेशी माहिती नसल्याने बस चालवताना अडचणी येत होत्या, असे एका चालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

एमएस बस प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. त्या बससंदर्भात देखील दापोडी वर्कशॉपमधील कर्मचार्‍यांनी आवाज उठवला होता. त्यानंतर आता शिवशाही बससंदर्भात वल्लभनगर आगारातील चालकांनी तक्रारींचा पाढा ‘पुढारी’कडे वाचून दाखवला. शिवशाही बस शिवनेरीच्या तुलनेत कमी दरात एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्याने प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे; परंतु शिवशाही बंद पडण्याच्या प्रकारामुळे चालकांबरोबरच प्रवाशांना देखील मनस्ताप सहन करावा लागत आहे. आम्हाला शिवशाही बस चालवण्यासंदर्भात प्रशिक्षण दिले जावे आणि त्यानंतरच बस मार्गावर घेऊन जाण्यास सांगावे,  अशी चालकांची मागणी आहे.